मुंबई : कोरोनाचा ( Coronavirus) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विषाणूला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आता देशात 1 मे 2021पासून लसीकरण (Covid vaccination) मोहिमेत 18+ लोकांना लस देण्यात येत आहे. परंतु, तरीही लसीकरणाबात (Covid vaccination) लोकांच्या मनात संभ्रमाचे वातावरण दिसून येत आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयाचा आजार असल्यास लस घ्यायला पाहिजे का? काही विपरित परिणाम होतील का? अशा शंका अनेकांच्या मनात येत आहेत. त्यामुळे लस घेणं बहुतेक लोक टाळतायेत. पण कुठलाही गंभीर आजार असल्यास कोविड-१९ ची लस घ्यायला हरकत नाही. परंतु, लस घेण्याआधी डॉक्टरांशी चर्चा करा. मात्र, शंका मनात ठेवून लसीकरण करायला विसरू नका, असे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लस कुणी आणि कधी घ्यावी, लस घेण्याआधी काय काळजी घ्यावी, लस घेतल्यानंतर काय काळजी घ्यावी, असे अनेक प्रश्न लोकांना पडलेले असतात. वयोवृदध आणि 18 वर्षांवरील सर्वांना लस अनिवार्य करण्यात आली आहे. पण गर्भवती महिलांना या लसीकरण मोहिमेतून वगळण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ही लस अतिशय फायदेशीर आहे. परंतु, ही लस टोचण्यापूर्वी आणि नंतर काही खबरदारी घेणं गरजेचं आहे.


पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयातील जनरल फिजिशियन डॉ. संजय नगरकर म्हणाले की, कुठल्याही आजारावर जर तुम्ही काही औषध घेत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच लसीकरण करून घ्या. औषधांमुळे लसीकरणात व्यत्यय येणार नाही याची काळजी घ्या. एखाद्याला गंभीर आजार असल्यास किंवा शस्त्रक्रिया झालेली असल्यासही लस घेता येते. परंतु, डॉक्टरांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घ्या. मात्र, आपल्याकडे मोनोक्लोनल अन्टीबॉडीज असल्यास लस घेणे टाळा.


लस घेण्याआधी, हे करा


डॉ. संजय पुढे म्हणाले, लस घेण्याआधी तुम्हाला पौष्टिक आहार घ्यावा लागेल. हळद, आले, हिरव्या पालेभाज्या, संपूर्ण फळे, कडधान्ये, शेंगा यांचा आहारात समावेश करा. जंकफूड, धुम्रपान व मदयपान करणे टाळावेत. कॅलरीयुक्त खाद्यपदार्थ खाणे टाळा. पुरेशी झोप आरोग्यासाठी फायदेशीर आहे. लस घेण्यासाठी रिकामी पोटी जाऊ नका. कारण लस घेतल्यानंतर अशक्तपणा किंवा क्वचित चक्कर आल्यासारखे वाटेल. इंजेक्शन दिलेल्या जागी वेदना होणे किंवा सूज येऊ शकते. थकवा, ताप आल्यास घाबरून जाऊ नका. डॉक्टरांनी दिलेली औषध घ्या. 


हे टाळा, या पदार्थांचा आहारात समावेश हवा


लसीकरणानंतर धूम्रपान किंवा मद्यपान टाळा. कारण यामुळे तुमची प्रतिकारशक्ती कमी होईल. लसीकरणानंतर स्ट्रॉबेरी, चेरी, संत्री,  हिरव्या भाज्या,  टोमॅटो यासारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा. फायबरयुक्त खाद्यपदार्थ खावेत, यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळेल. फळे, काळ्या मनुका, आणि अंडी सारखी व्हिटॅमिन सी आणि डी समृध्द असलेले पदार्थ घ्या. निरोगी आहार आपल्या प्रतिकारशक्तीला चालना देईल आणि शरीरातील जळजळ कमी करेल. पुरेसे पाणी प्या. याशिवाय लसीकरण करून घेतल्यानंतरही कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन करा. नियमित हात स्वच्छ धुवा, तोंडावर मास्क लावा आणि सामाजिक अंतर राखा, असे डॉ. संजय म्हणाले.


लसीकरणातून गर्भवती मातांना वगळले 


पुण्यातील मदरहूड रुग्णालयातील ज्येष्ठ प्रसूतीशास्त्रज्ञ सल्लागार डॉ. राजेश्वरी पवार यांनी सांगितले की, “गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या मातांना कोविड-१९ ची लस अतिशय सुरक्षित असल्याची खात्री करुन यूएसएमध्ये ही लस दिली जात आहे. या लसीमुळे मुलांच्या शरीरातही अण्टीबॉडीज वाढत असल्याचे दिसून आले आहे. परंतु, भारतात गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या मातांबद्दल कोणताही अभ्यास झालेला नाही. त्यामुळे भारत सरकारने कोरोना लसीकरणातून गर्भवती मातांना वगळले आहे. याशिवाय ज्या महिला गर्भारपणाची योजना आखत आहेत, अशा महिलांनी स्त्रीरोग तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार लस घेणं गरजेचं आहे.