अमित शाहच महाराष्ट्राच्या सत्ताकारणातील चाणक्य; ट्विट व्हायरल
राज्याच्या राजकारणातही अमित शाह यांची खेळी?
मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर स्थिर सरकार स्थापन करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला वेगळं वळण आलं. एकिकडे शिवसेना भाजपच्या युतीत मीठाचा खडा पडला आणि राष्ट्रवादी, काँग्रेससोबत शिवसेनेची सत्तास्थापनेची गणितं आकारास येऊ लागली.
अविरत चर्चासत्रांच्या या मालिकेला धक्का तेव्हा लागला जेव्हा एका रात्रीच सत्तेच्या या शर्यतीपासून सुरुवातीला दूर राहणाऱ्या भाजपकडून खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची, तर राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केली.
महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या या सर्व घडामोडींमध्ये जितकी चर्चा शरद पवार यांच्या नावाची होत आहे, तितकीच चर्चा आता केंद्रीय गृहमंत्री अजित पवार यांच्याही नावाही होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सत्तेच्या या रणनितीमध्ये शाह हेच खरे चाणक्य असल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी देण्यास सुरुवात केली आहे.
'कभी कभी लगता है अपुनीच भगवान है.....' असा 'सेक्रेड गेम्स' या वेब सीरिजमधील डायलॉग लिहित त्याच्याशी शाह यांचा संदर्भ जोडला गेला आहे. तर, 'ही झाली तुमची फसवणूक.....' अशा आशयाचेही ट्विट काहीजणांनी पोस्ट केले आहेत.
राजकारणाच्या या रणांगणात अमित शाह यांच्या अनुभवाचा आणि कारकिर्दीचा एकंदर अंदाज घेत काही नेटकऱ्यांनी तर, देश विदेशात सरकार स्थापन करण्यासाठी येथे संपर्क साधा अशी जाहिरात करणारे मीम्सही पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे.
देशात भाजपची सत्ता विस्तारत असतानात अनेक निवडणुकांमध्ये ज्या राज्यात बहुमताच्या मुद्द्यावर भाजप सरकारला अडचणी येऊ लागल्या होत्या तेव्हा प्रत्येक वेळी अमित शाह पक्षाचे तारणहार झाल्याचं पाहायला मिळालं. बहुमताची आकडेवारी साधत सत्तेचं गणित सोडवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या राजनैतिक चाणक्यांची महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकी कसी भूमिका आहे, हे अद्यापही कळू शकलेलं नाही. पण, नेटकऱ्यांना मात्र त्यांच्यावर भलताच विश्वास असल्याचंच पाहायला मिळत आहे.