सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : राज्यासह नाशिक (Nashik News) जिल्ह्यात कोरोनाचे (Corona) रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहेत. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा हायअलर्टवर आहेत. राज्यात काही ठिकाणी मास्कची (Mask) सक्ती देखील करण्यात आली आहे. अशातच केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister Bharti Pawar) यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मात्र या बैठकीत चर्चेचा विषय ठरला तो मालेगावचे आयुक्त यांच्या गैरहजेरीचा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त भालचंद्र गोसावी हे वारंवार केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्या बैठकीत अनुपस्थितीत राहत असल्याची माहिती समोर आली. सोमवारी झालेल्या बैठकीमध्येही मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त भालचंद्र गोसावी हे अनुपस्थित असल्याने भारती पवार चांगल्याच भडकल्या. एवढी महत्वाची बैठक असताना आयुक्त अनुपस्थितीत राहतातच कसे? असा देखील प्रश्न त्यांनी बैठकीत उपस्थित केला. भारती पवार यांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतर महापालिका आयुक्त बैठकीला उपस्थित राहिले. मात्र भारती पवार यांनी भर बैठकीतही याबाबत नाराजी व्यक्त केली.


महापालिकेचे आयुक्त हे माझ्याच बैठकीत का अनुपस्थितीत राहतात याचं मला कारण माहिती नाही, असे भारती पवार म्हणाल्या. आयुक्तांना वारंवार सांगून देखील मालेगाव परिसरातील कुठल्याच प्रकारचे आकडेवारी देत नसल्याचे देखील भारती पवार म्हणाल्या. केंद्रीय मंत्री भारती पवार आपल्यावर भडकल्या असल्याचे समजताच आयुक्त हे बैठकीत उपस्थित झाले. आयुक्तांनी स्पष्टीकरण देण्यास सुरुवात केल्यानंतर भारती पवार पुन्हा भडकल्या आणि तुम्ही पत्रकार परिषद घ्या असे म्हणाल्या. त्यावर चिडलेल्या भारती पवार यांच्यासमोर आयुक्तांनी हात देखील जोडले.


"पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.  पंतप्रधानांनी आग्रह केला आहे की भारतात दीड लाखांपेक्षा जास्त आरोग्य आणि कल्याण केंद्र झाली पाहिजेत. त्याचा फायदा रुग्णाला व्हायला हवा. ही सर्व यंत्रणा तयार असून त्याची संख्या वाढवी म्हणून सरकारने अर्थसंकल्पात निधी मंजूर केला आहे. राहिलेल्या कामांचा पाठपुरावा करुन लवकरच ती पूर्ण करुन घेतली जाणार आहेत," असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी स्पष्ट केले.


आयुक्तांवर भडकल्या भारती पवार


"मालेगाव विभागाचा आढावा मला प्राप्त झालेला नाही. वारंवार सूचना करुनसुद्धा मालेगावकडून उत्तर आलेले नाही. त्याबद्दल मी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या बैठकीमध्येही आयुक्त उपस्थित नव्हते. याविषयी आयुक्तांनी कळवायला हवे होते. विचारणा करुनही दुर्दैवाने आयुक्त उपस्थित राहत नाहीत. कारवाईचा इशारा दिल्यानंतर आयुक्त कार्यालयात पोहोचले आहेत. गंभीर विषय असल्याने सगळ्यांना सतर्क राहणे गरजेचे आहे. पंतप्रधान स्वतः याकडे लक्ष देऊन असताना आपण कमी पडत असू तर हा निषेधाचा विषय होईल. मालेगावकडून आम्हाला वारंवार चालढकल होताना दिसते. इशारा दिल्यानंतर त्यांनी अहवाल सादर केला आहे, अशी नाराजी डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केली.