रायगड : जनआशिर्वाद यात्रेचा आजचा पाचवा दिवस आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे कोकणच्या दौऱ्यावर आहेत. महाड इथे पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्य दिनी केलेल्या भाषणाचा संदर्भ देत ज्यांना स्वातंत्र्यदिन कितवा आहे हे माहित नाही, अशा माणसांबद्दल काय बोलायचं, असं सांगत नारायण राणे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना केंद्रीय मंत्री नारायण राणेंची जीभ घसरली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कानाशिलात लगावण्याचं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यांना बोलायचा अधिकार आहे का, बाजूला एखादा सेक्रेटरी ठेवावा आणि मग माहिती घेऊन बोलावं अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.


‘त्यांचं अॅडव्हाईज कोण, त्यांनाच काही कळत नाही. ते काय आम्हाला अॅडव्हाईज करणार? ते काय डॉक्टर आहेत का? तिसऱ्या लाटेचा कुठून आवाज आला त्यांना? आणि ती पण लहान मुलांना? अपशकुनासारखं बोलू नको म्हणावं. किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून? अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. हे काय देशाच्या स्वातंत्र्य दिनाची तुम्हाला माहिती नसावी?’ अशा शब्दात राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.


केंद्रीय मंत्री झाल्यानंतर नारायण राणे यांनी जनआशिर्वाद यात्रेच्या पहिल्या दिवसापासूनच मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. नारायण राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद रंगण्याची चिन्ह आहेत.