बुलडाणा : लग्नाची वरात म्हणजे नुसता कल्ला. आपल्या मित्राच्या किंवा मैत्रिणींच्या वरातीत दंगा दिसला नाही तर नवल. अन्यथा ती वऱ्हाडी मंडळी कसली. पण संतनगरी शेगावात एक वेगळीच वरात पाहायला मिळाली. या वरातीत चक्क नववधूच घोड्यावर बसून लग्नमंडपात पोहोचली. आता लग्न म्हटले की नवरी मुलगी नटूनथटून लग्नमंडपात पोहोचते पण ही वधू मात्र नवऱ्यामुलासारखी रुबाबाने घोड्यावरून आली. अर्थात तिला पाहून इतरांना आश्चर्याचा धक्का बसला नसेल तर नवल. शेगाव येथील राजेंद्र चव्हाण यांनी आपली मुलगी नववधू प्रियांकाची घोड्यावरून वाजत-गाजत मिरवणूक काढली. प्रियांकाचा विवाह २० एप्रिलला थाटामाटात पार पडला. प्रियांकाचा विवाह अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील नंदकिशोर सोनोने यांचेशी थाटात झाला. 


एरव्ही नवरदेव घोडीवरून येताना अनेकांनी पाहिले असेल पण नवऱ्यामुलीला असं लग्नमंडपात येताना पाहाण्याची क्वचितच वेळ असेल. यावर ही नववधू प्रियंका म्हणते की, तिला आणि तिच्या कुटुंबियांना समाजात स्त्री पुरुष समानतेचा संदेश द्यायचा आहे. ‘मुली आणि मुले समान आहेत. त्यांना वेगळी वागणूक का म्हणून द्यावी? दोघांनाही समान संधी द्यायला हव्यात. हीच बाब मला समाजाला सांगायची आहे. नेहमी नवऱ्यामुलानेच घोड्यावरून थाटामाटात का यावं? मुलीने का नाही? असा प्रश्न उपस्थित करते. म्हणूनच ती आपल्या लग्नाच्या दिवशी खास नवऱ्यामुलासारखी तयार होऊन आली होती. तिने डिजेवर बिनधास्त ठेकाही धरल्याने प्रियंकाची वरात शेगावामध्ये चर्चेचा विषय ठरली.