पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात अवकाळी पाऊस
मुंबई : सातारा जिल्ह्यात पाटण,तारळे, कराडसह कोरेगाव तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सातारा जिल्ह्यात गेली १५ दिवस तापमान ४३ अंशावर गेल्याने सातारकर उन्हामुळे हॆराण झाले होते मात्र सातारा जिल्ह्यात जोरदार अवकाळी पावसामुळे शेतकरी सुखावला. गारांसह जोरदार पाउस झाल्याने शेतीच्या मशागतीलाही फायदा होणार आहे. मात्र या अवकाळी पावसामुळे आंबा, पपई पिकाचं मोठं नुकसान झालंय.
सांगलीत जोरदार गारांचा पाऊस झाला. सायंकाळी शहरात वादळी वारा आणि विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. शहरात अचानक पाऊस झाल्याने जनजीवन विसखळीत झाले आहे. मागील काही दिवसा पासून सांगलीचे तापमान 40 अंश्याच्या आसपास होते. मात्र शहरात आत्ता पाऊस सुरु झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे.
कोकणात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. बांदा-सावंतवाडी-कुडाळ परिसरात विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यावर पाऊस झाला. मात्र भर वाढलेल्या पाऱ्यामुळं हैराण झालेल्या नारिकांना गारव्याचा सुखद अनुभव घेता आला. कोल्हापुरातही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. जोरदार आलेल्या पावसामुळे शहरातल्या मुख्य रस्त्यावरील होर्डिंग्जचे नुकसान झालं. तसंच अचानक आलेल्या पावसामुळे शहरातल्या नागरिकांची आणि प्रवाशांची चांगलीच त्रेधातिरपीट मिळाली.