नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी
नांदेड : नांदेडमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. सकाळपासून नांदेडमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले होतं. दुपारच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली.
पावसासोबत हलक्या गाराही पडल्या. सुमारे १५ मिनिटे या अवकाळी पावसाचा जोर होता. अचानक वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे सर्वांची त्रेधातिरपीट उडाली. जोरदार वाऱ्यामुळे शहरातील अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला.
या पावसामुळे काहीकाळ उन्हापासून नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागला.
तर, सांगली शहरात विजेच्या कडकडाट आणि जोरदार वादळी वा-यासह गारांचा पाऊस झाला. अचानक झालेल्या पावसामुळे लोकांची तारंबळ उडाली. या अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या शहरवासियांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.