कोरोनाने मारलं, अवकाळी पावसाने झोडपलं, शेती उद्ध्वस्त, शेतकरी हतबल
अवकाळी पावसाने राज्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावाने राज्यात गेल्या लॉकडाऊन लागला आणि याची झळ सर्वच क्षेत्राला बसली. लॉकडाऊनमुळे शेतकरी आणि शेती उद्योग मोठ्या अडचणीत सापडला. त्यातच 2019 ला आलेल्या महापुरात शेतकऱ्यांचं होत्याचं नव्हतं झालं. यातून सावरत नाही तोच लहरी हवामानाचा फटका शेतकऱ्याला बसला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
पोटच्या मुलासारखं पिकांना जपत असलेला शेतकरी अवकाळी पावसाने पूर्णपणे ढासळला आहे. ऐन हिवाळ्यात राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरील लावली आहे. याचा सर्वाधिक फटका बसला आहे तो ग्रामीण भागाला. शेतपिकं, फळबागांचं अतोनात नुकसान झालं आहे. तर कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी पार हतबल झाले आहेत..
नगदी पिकांना फटका
राज्यात पुन्हा आलेल्या अवकाळी पावसानं अनेक नगदी पिकांना फटका बसलाय. नाशिक जिल्ह्यात पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. टोमॅटोलाही पावसाचा फटका बसलाय. टॉमॅटो शंभरीवर गेला असताना शेतकऱ्यांना चांगला पैसा हाती लागण्याची आशा होती. मात्र पावसामुळे काढणीला आलेला टोमॅटो खराब होत आहे.
ढगाळ वातावरणाचा कांद्याला दणका
येवल्यातील कांदा उत्पादकांना नुकसान टाळण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी करावी लागतेय. पुणे जिल्ह्याच्या शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यात ढगाळ हवामान, धुकं आणि अवकाळी पावसामुळे कांदा पीक धोक्यात आलंय.वातावरणातील बदलामुळे कांद्यावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून पिळ पडून मावा करपा यांसारख्या रोगांनी कांदा शेतातच नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. काढणीला आलेला कांदाही शेतातच सडण्याची भीती आहे.
द्राक्षबागांना मोठा फटका
सांगली जिल्ह्यात द्राक्षांसाठी प्रसिद्ध तासगाव तालुक्यात पावसानं मोठं नुकसान झालं आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस बरसला. यामुळं तासगाव तालुक्यातील मणेराजुरी, योगेवाडी, कुमठे, अंजनी, बोरगावसह अनेक गावातल्या द्राक्षबागांमध्ये पाणी साचलंय. शेतकऱ्यांना आता बांध फोडून बागेतलं पाणी काढावं लागतंय. पंढरपूर आणि परिसरातही द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय. पंढरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागांची लागवड आहे. अनेक द्राक्ष बागांमध्ये पाणी साठलंय. द्राक्ष घडामध्ये पाणी भरल्याने हे घड खराब होणार आहेत.
मक्याची कणसं भिजून नुकसान
सोलापूर जिल्ह्यात पडत असलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या अनेक पिकांचं नुकसान झालंय. सांगोला तालुक्यात काढून ठेवलेली मक्याची कणसं भिजली आहेत. रात्री पासून पडणा-या पावसाने शेतात पाणी साठल्याने ही कणसं भिजून नुकसान झालं आहे. त्यामुळे हाता- तोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.
अवकाळी पावसामुळे रोगांचा प्रादुर्भाव
अवकाळी पावसामुळे आंब्यावर तुडतुड्या आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतोय. तर स्ट्रॉबेरीला पावसाचा मोठा फटका बसला. स्ट्रॉबेरीच्या रोपांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अनेक रोपांची पाने गळून गेलीयत. रायगडमध्ये कडधान्य, भातशेती पिकाला अवकाळीचा फटका बसला आहे.
अवकाळी पावसाचा मोठा फटका रायगडमधल्या शेतकऱ्यांना बसला आहे. पावसामुळे वाल, पावटा, हरभरा, तूर यासारख्या कडधान्य पिकांबरोबरच कलिंगडाचं मोठं नुकसान झालंय. रचून ठेवलेले भाताचे भारे भिजलेत. आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे