प्रवीण तांडेकर, झी मीडिया 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Bhandara Crime News: नात्याला काळिमा फासणारी घटना महाराष्ट्रात घडली आहे. प्रेमविवाह (Love Marriage) केल्याच्या रागातून आपल्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त केल्याचा प्रकार भंडारा जिल्ह्यात घडला आहे. जिल्ह्यातील कवडसी/खैरी परिसरात ही घटना घडली असून या मुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 


प्रेम विवाह केल्याचा राग


बहिणीसोबत प्रेम विवाह केल्याच्या रागात जावयावर कुऱ्हाडीने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या कवडसी /खैरी परिसरात घडली आहे. ओमप्रकाश बळीराम पडारे २८ राहणार जैतपुर /बारवा असे जखमीचे नाव आहे. पत्नीच्या भावानेच हा प्रकार केल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.


कुटुंबीयांना मान्य नव्हते लग्न 


ओमप्रकाश गुरढा येथे ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून काम करत होता. ओमप्रकाशने आरोपीच्या
बहिणीशी जानेवारी महिन्यात प्रेम विवाह केला होता. मात्र, तिच्या कुटुंबीयांना त्यांचे लग्न मान्य नव्हते. त्यावेळी त्यांच्याच कडाक्याचे भांडण झाले होते. पोलीसात तक्रारही दाखल झाली होती. मात्र तिच्या घरच्यांचा मनात राग कायम होता. म्हणूनच त्यांनी जावयाचा काटा काढायचा कट रचला. ओमप्रकाश एकटा असल्याचा डाव साधत त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. आज घडलेल्या घटनेमुळे परिसर हादरला आहे. 


जावयावर केला जीवघेणा हल्ला 


आरोपींनी जावयाच्या गाडीला आधी ठोकर दिली. नंतर त्याचा हाताने गळा दाबण्याचा प्रयत्न केला. नंतर स्वतः जवळ असलेल्या कुऱ्हाडीने त्याच्यावर तीन घाव करत त्याला गंभीर जखमी केले. ओमप्रकाशचा आवाज ऐकून आजूबाजूच्या तरुणांनी धाव घेत त्याला आरोपीच्या तावडीतून वाचवले. त्यामुळंच त्याचा जीव वाचू शकला, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे.


आरोपी घटनास्थळावरुन पसार 


या घटनेची माहिती पालांदुर पोलीसांना देण्यात आली असून दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले आहेत. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. तर जखमीला उपचारासाठी लाखांदूर येथील रूग्णालयात दाखल केला आहे.