सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीमध्ये समाविष्ट फुरसुंगी (Fursungi) आणि उरुळी देवाची (Uruli Devachi) या गावांची नवी नगरपालिका करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मंगळवारी जाहीर केला. या निर्णयानंतर आता पुण्यातील  वाघोलीची(Wagholi ) देखील स्वतंत्र नगरपालिका(independent municipal corporation) करण्याची मागणी केली आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी ग्रामस्थांनी ही मागणी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही गावे पुन्हा महापालिकेतून वगळण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या दोन गावांची एकत्रित नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर आता महानगरपालिकेमध्ये समाविष्ट असलेल्या वाघोली ग्रामस्थांकडून देखील वाघोली साठी स्वतंत्र नगरपालिका निर्माण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


पुणे महानगरपालिका हद्दीलगतच्या गावांचा पुणे महानगरपालिकेत समावेश झाला होता. यामध्ये उरुळी देवाची आणि फुरसुंगी या सह 11 गावांचा समावेश झाला. त्या नंतर वाघोली सह अन्य 23 गावांचा समावेश झाला.  मात्र, कोणत्याही सुविधा नसतांना महापालिकेच्या मिळकत ''कराला'' समाविष्ट गावांचा विरोध आहे.


तर, सर्वच खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांचे ''अर्थ''कारणाकडे लक्ष जनतेच्या समस्याकडे दुर्लक्ष असून ग्रामपंचायतीच्या तुलनेत वाढीव दराने ''कर'' आकारणी होत असून त्या तुलनेत गावांना सोयी-सुविधा मिळत नसल्याची तक्रार या गावाच्या ग्रामस्थांनी केली होती. यामुळे आता वाघोलीतील ग्रामस्थांकडून देखील स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या संदर्भात वाघोली ग्रामस्थांकडून उद्या संध्याकाळी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले आहे.