उस्मानाबाद : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यामातून सॅनिटायझर वाटप करण्यात आले. मात्र, उस्मानाबादमध्ये रॉकेल मिळत नसल्याने गृहिणींनी शक्कल लढवत चूल पेटवायला सॅनिटायझरचा वापर केल्याचा धोकादायक प्रकार पुढे आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उस्मानाबाद जिल्ह्यातील काही गावांमध्ये आगळीवेगळी शक्कल लढवली जात आहे. रॉकेल मिळत नाही म्हणून चूल पेटवण्यासाठी चक्क सॅनिटायझरचा वापर होत आहे. सॅनिटायझर स्प्रे मारून चूल पेटविण्यात येत आहे. याला म्हणतात जुगाड. लोक कोणत्या गोष्टीचा, कशासाठी वापर करतील याचा नेम नाही. आता उस्मानाबादचंच हे उदाहरण पाहा.


कोरोना संकटकाळात ग्रामपंचायतीने गावात सॅनिटायझर पुरवले ते हात निर्जंतुक करण्यासाठी. पण गावकरी सध्या या सॅनिटायझरचा वापर चक्क चुली पेटवण्यासाठी करत आहेत. पावसाळ्यात चूल पेटवणे हे नक्कीच खायचं काम नाही. त्यात रेशनवर रॉकेलही मिळत नाही. त्यामुळे आयाबायांनी सॅनिटायझरचा वापर करून जाळ काढायला सुरूवात केली आहे, अशी माहिती गावकरी चंद्रभागा लिमये यांनी दिली.


 मात्र हा प्रकार फारच धोकादायक आहे. सॅनिटायझरचा असा वापर वेळप्रसंगी जीवावरही बेतू शकतो, असा इशारा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी दिला आहे. त्यामुळे केवळ सॅनिटायझरचा पुरवठा करून ग्रामपंचायतींना आपली जबाबदारी झटकता येणार नाही. तर सॅनिटायझर वापराबाबत जनजागृती देखील करावी लागेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.