घरातून कचरा उचलला की नाही, QR कोड सांगणार
महाराष्ट्रात पहिल्यांदा कचरा संकलनासाठी क्यूआर कोड सिस्टीम लावण्यात आली आहे.प्रायोगिक तत्वावर धरमपेठ झोनमधून सुरुवात..
नागपूर: कचरा उचलणारी गाडी नियमित येत नाही,घरातून कचरा नियमित उचलला जात नाही अशाप्रकारच्या अनेक तक्रारी नेहमीच नागरिकांकडून करण्यात येतात. मात्र नागपूर महानगर पालिकेनं यावर अफलातून तोडगा शोधला आहे. नागरिकांच्या नेहमीच्या अशा तक्रारींवर यापुढे लगाम घालण्याच्या दृष्टीनं क्यू.आर कोड’च्या माध्यमातून आता कुठल्या घरातून कचरा उचलण्यात आला अथवा नाही, याची इत्यंभूत माहिती मिळणार आहे. त्यामुळे कचरा संकलनाची व्यवस्था आता अधिक व्यापक आणि पारदर्शक होणार आहे.तेलंखेडी परिसरात 10 घरांतून क्यू.आर कोडच्या माध्यमातून कचरा संकलन करण्यात येतंय. महापौर दयाशंकर तिवारी यांनी या व्यवस्थेची तेलंखडी परिसरात पाहणी केली .
नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड व नागपूर महानगरपालिकेच्या वतीने नागपूर शहरात स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम प्रायोगिक तत्त्वावर क्यू.आर कोडच्या माध्यमातून कचरा संकलन सुरु करण्यात आलं आहे. या अंतर्गत नागरिकांच्या घरांवर क्यूआर कोडचे स्टिकर लावण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिकेकडे सतत प्राप्त होणाऱ्या या तक्रारीचा तोडगा काढण्यासाठी या अभिनव नवीन व्यवस्थेमध्ये प्रायोगिक तत्त्वावर रविनगर अमरावती रोड येथील तेलंखेडी येथील दहा घरांमध्ये हे क्यूआर कोड स्टिकर लावण्यात आले आहे. या व्यवस्थेमुळे नागरिकांच्या घरातून ठराविक वेळेत कचरा उचलला जाईल. नागरिकसुद्धा या व्यवस्थेमुळे समाधानी आहेत.
महापौरांनी केली QR कोड माध्यमातून कचरा संकलन व्यवस्थेची पाहणी
महापौर दयाशंकर तिवारी यांनी आज तेलंखेडी येथील दहा घरांमध्ये जाऊन QR कोड माध्यमातून कचरा संकलन व्यवस्थेची पाहणी करत नागरिकांशी संवाद साधला .या व्यवस्थेबद्दल माहिती प्राप्त करून घेतली. महापौरांच्या उपस्थितीत कचरा गाडी तिथे आली, स्वच्छता कर्मचारी यांनी घरात लावलेले क्यू आर कोड स्कॅन करून कचरा घेतला आणि त्याचे वजन करून कचरा गाडीमध्ये टाकला.दहा दिवस प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबविल्यानंतर शहरातील इतर भागात कचरा संकलनासाठी QR कोड चा वापर होणार आहे.याबाबत बोलताना महापौर म्हणाले घरोघरी कचरा संकलन करणारे स्वच्छतादूत वेळेवर येत नाही, अशी नगरसेवक आणि नागरिकांची तक्रार होती. त्यांच्या वेळासुद्धा निश्चित नसतात. आता स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीमच्या माध्यमातून नागपूर स्मार्ट सिटी व मनपा यांच्या सहकार्याने तक्रारींचे निराकरण करणे शक्य होणार आहे. कचरा संकलन करणारे स्वच्छतादूत ज्या घरातील कचरा घेईल त्याचा घर क्रमांक, घरमालकाचे नाव संबंधित अधिकाऱ्यांना प्राप्त होईल. असा अभिनव प्रयोग करणारी नागपूर महानगरपालिका ही राज्यातील पहिली महानगरपालिका आहे. हा प्रयोग अधिकाऱ्यांशी चर्चा करून एका झोनमध्ये प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात येईल. त्यानंतर संपूर्ण शहरात लागू करण्याचा विचार करू. या माध्यमातून नागरिकांची कचऱ्याची समस्या सोडविण्याची नागपूर महानगरपालिकेचा प्रयत्न आहे, असेही महापौरांनी सांगितले.