सोनू भिडे, नाशिक- रस्ता माहित नसल्यास किंवा चुकल्यास आपण गुगल मॅपचा वापर करतो मात्र याच गुगल मॅपमुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. संगमनेर येथून भांडारदऱ्याला निघालेले मित्र रस्ता चुकले. यानंतर त्यांनी गुगल मॅपचा वापर केला. मात्र रस्त्यात कृष्णवंती नदीत त्यांची कार बुडाली यात आशिष प्रभाकर पोलादकर आणि रमाकांत प्रभाकर देशमुख यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या दहा दिवसापासून संपूर्ण राज्यात प्रचंड पाऊस सुरु आहे. पर्यटक निसर्गसौदर्याचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडत आहेत. यापावसातही पर्यटक पाऊस व निसर्गाचा आनंद घेण्यासाठी भंडारदरा परिसराकडे येत आहेत, परंतु पावसामुळे या भागातील रस्ते व वाटा निसरड्या झाल्या आहेत. वळणाच्या ठिकाणी पाऊस व धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज येत नाही आणि यामुळे अपघात होत आहेत.


काय आहे घटना 
औरंगाबाद येथील आशिष प्रभाकर पोलादकर, वय ३४ रा.पोलाद तालुका सिल्लोड, रमाकांत प्रभाकर देशमुख वय ३७ रा ताड पिंपळगाव, ता.कन्नड आणि हिंगोलीचे अनंत रामराव मगर वय ३६ हे तिघंही मित्र संगमनेरला त्यांच्या मित्राकडे कार्यक्रमानिमित्त आले होते. जवळच भंडारदरा हे पर्यटन स्थळ असल्याने ते पाहण्यासाठी ते शुक्रवारी संध्याकाळी निघाले. काही अंतर पुढे गेल्यावर आपण रस्ता चुकल्याच त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी गुगल मॅपचा आधार घेत भंडारदरा गाठण्याचा निर्णय घेतला.


गुगल मॅपने दाखविलेल्या दिशेने निघाले होते. रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास मॅपच्या दिशेने जाता असताना त्यांची क्रेटा गाडी कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या पेंडशेत शिवारात कोल्हार घोटी रस्त्यावर रस्त्याचा अंदाज न आल्यान गाडी सरकत थेट कृष्णवंत नदीत जाऊन बुडाली. गाडीत असलेले आशिष आणि रमाकांत यांचा गाडीत गुदमरून मृत्यू झाला तर त्यांचा मित्र अनंत याने खिडकीतून उडी मारल्याने त्याचा जीव वाचला आहे. याच ठिकाणी रात्री पाण्याचा अंदाज न आल्याने एका वृद्धाचा सुद्धा बुडून मृत्यू झाला आहे. 


परिसरातील नागरिकांनी घटना बघितली त्यांनी राजूर पोलिसांना घटनेची माहिती दिली. तात्काळ पोलीस घटना स्थळी दाखल झाले. पोलिसांनी अंधारात शोध कार्य सुरु केले. जेसीबी आणि ट्रॅक्टर मदतीने नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. रात्री उशिरा एकाचा मृतदेह मिळून आला. 


शुक्रवारी साल्हेर किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांचा चढाई करत असताना दोन जणांचा पाय घसरून अपघात झाला आहे. यात एकाचा मृत्यू झाला आणि एक गंभीर जखमी झाला आहे. तर भंडारदऱ्याला जात असताना कृष्णवंती नदीत बुडून तीन जणाचा मृत्यू झाल आहे. दिवस भरत पर्यटनासाठी आलेल्या तीन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.  यामुळे पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांनी दिवस असेपर्यंतच पर्यटनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन वन विभाग आणि पोलिसांकडून करण्यात आले आहे.