Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी सध्या उपोषणावर बसलेले मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर विषप्रयोग होऊ शकतो असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar ) यांनी केला आहे. मनोज जरांगे यांना दिली जाणारी औषधं, सलाईन, इंजेक्शन आणि जेवण तपासून द्या असा सल्लाही त्यांनी दिला आहे. मनोज जरांगे यांच्यामुळे अनेकांचं राजकीय भवितव्य धोक्यात आल्याने त्यांच्या घातपाताची शक्यता असल्याचंही ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले आहेत. 


प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"मनोज जरांगे पाटील यांनी टोकाचं पाऊल घेतलं असल्याचं दिसत आहे. त्यांना जी काही औषधं, सलाईन, जेवणं, ज्यूस दिला जात आहे, ते आधी तपासलं जावं. यानंतरच त्यांना या गोष्टी दिल्या जाव्यात. राज्य सरकार अशी व्यवस्था करेल अशी अपेक्षा मी करत आहे," असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. 


याआधीही प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना 10-15 लोकांमध्ये बसून जेवू नये असा सल्ला दिला होता. गर्दीत लोकांसाठी जे जेवण येतं, तेच खावं असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं होतं. 


'लोकसभा निवडणूक लढवा'


दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढण्याचा सल्ला दिला होता. स्वत:च्या शरीराची त्याग करण्यात काहीही अर्थ नाही. उपोषणातून जागृती करायची होती, ती झाली आहे. आता आरक्षण मिळविणे हे ध्यैय्य असावं असं आम्ही मानतो. म्हणून, जरांगे पाटील यांनी येत्या लोकसभेत कोणत्याही पक्षाचा आधार न घेता जालना येथून लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवावी असं ते म्हणाले होते. 


त्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले होते की, 'एकदा आरक्षण मिळू द्या, मराठे कुणाचा टांगा उलटा करतील काही नेम नाही. मी लोकसभा लढवावी असं त्यांनी चांगल्या भावनेतून म्हटलं असावं. आम्ही सगळ्या पक्षातील नेत्यांना आजपर्यंत साथ दिली आहे'.


दरम्यान सकल मराठा समाजाचे समन्वयक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले होते. कोल्हापुरातील सर्किट हाऊस येथे मुख्यमंत्री आणि मराठा समन्वयक यांच्यामध्ये बैठक झाली होती. बैठकीत मनोज जरांगे पाटील यांची तब्येत आणि त्यांचे उपोषण सुटावं यासाठी सरकार काय प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली होती. 


"20 तारखेपासून पुढे सरकारने सरकारच बघावं"


20 तारखेपर्यत सगेसोयरे कायदयाची अंमलबजावणी करा, हैद्राबाद गॅझेट स्वीकारा, शिंदे समितीची मुदत 1 वर्ष वाढवा, आमच्यावर दाखल केलेले राज्यतील गुन्हे मागे घ्या. हे सरकारला करावंच लागेल अन्यथा 20 तारखेपासून पुढे सरकारने सरकारच बघावं अशा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.