Prakash Ambedkar Interview: सत्तेत बसणं आणि अजेंडा ठरवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. या देशाचा अजेंडा सेट करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Vanchit Bahujan Aghadi President Prakash Ambedkar) यांनी केला आहे. 'झी 24 तास'चा विशेष कार्यक्रम 'Black and White'मध्ये चे मुख्य संपादक निलेश खरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी संवाद साधला. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी त्यांनी दलित चळवळ (Dalit Movement), पुढील राजकीय वाटचाल, समोरील आव्हानं, भाजप (BJP) अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी मतं मांडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दलित चळवळ आणि नेतृत्त्व गेल्या 60 वर्षात राजकीयदृष्ट्या यशस्वी होताना दिसत नसल्याबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले "किती आमदार आणि खासदार यावर आम्ही यश मोजत नसून, आम्ही मानलेला अजेंडा देशाचा झाला की नाही हे पाहत आहोत. आमच्या मताप्रमाणे या देशाचा अजेंडा सेट करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. त्यामागे इतर राजकीय पक्ष गेले. त्यामुळे आम्ही राज्य करुन ते राबवण्यापेक्षा अजेंडा सेट करुन ज्यांनी स्विकारला तो सत्तेवर आला आणि राज्यकर्ता झाला. त्यामुळे येथील सर्व दलित चळवळी अयशस्वी झाल्या असं म्हणणार नाही". 


"सत्तेत बसणं आणि अजेंडा ठरवणं या दोन वेगळ्या गोष्टी"


"सत्तेत बसणं आणि अजेंडा ठरवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अजेंडा जेव्हा तुम्ही ठरवता तेव्हा तुम्हाला हवं असणारं परिवर्तन मान्य करता. हे परिवर्तन तुम्ही राबवायचं की जे कोणी सत्तेवर आहेत त्यांनी राबवायचं यामुळे फरक पडत नाही. पण अजेंडा ठरवणं महत्त्वाचं आहे," असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. 


"संतांचा अजेंडा आता केंद्रस्थानी"


पुढे ते म्हणाले की "संविधान आणि संत हे समान आहेत. संतांचा जो अजेंडा नेहमी बाजूला सारण्यात आला तो माझ्या अंदाजाने केंद्रस्थानी आला. स्त्रियांचं स्वातंत्र्य, बंधुभाव, सन्मान कऱणं हा विचार वेगवेगळ्या संतांच्या रुपाने आला. पण त्याचा सामना मनुस्मृतीशी झाला. पहिल्यांदाच सगळे मनुस्मृती बाजूला ठेवण्यास आणि संविधानातील सामाजिक रचना मान्य करण्यास तयार असल्याचं दिसत आहे. हे मान्य करुन घेणं, समाजात रुजवणं आणि समाजव्यवस्थेचा भाग होणं हा आम्ही सर्वात लढा मानतो. हे झाल्यास आमचं आंदोलन यशस्वी झालं असं मी मानतो".


"माझ्याविरोधात विषारी प्रचार केला"


"गेल्या 50 वर्षात आरएसएस आणि काँग्रेसकडून एक समज निर्माण करण्यात आला. बाबासाहेबांनी बौद्ध विचारसरणी मान्य करण्यासंबंधीचा जो प्रचार करण्यात आला, त्याची धार आता कमी झालेली दिसत आहे. मी पहिल्यांदा 1984-85 च्या निवडणुकीत पहिल्यांदा उभा राहिलो तेव्हा काँग्रेस आणि भाजपा एकत्र आले आणि नानात-हेच्या घोषणा दिल्या. शेगावचं गजानन महाराजांचं मंदिर माझ्या मतदारसंघात आहे. मी निवडून आलो तर इथे मशीद होईल असा प्रचार करण्यात आला होता. हा विषारी प्रचार आहे. तुम्हाला प्रत्युत्तर देण्यास वेळ मिळत नाही आणि निवडणुकीवर त्याचा परिणाम होतो," असं सांगत प्रकाश आंबेडकरांनी राजकारणातील आपला प्रवास उलगडला. 


"काश्मीरचा प्रश्न सोडवला नाही सांगत डाव्या पक्षांनी बाबासाहेबांना पाठिंबा देण्यास नकार दिला होता. आरएसएला पाकिस्तानव्याप्त काश्मीर नको असतानाही ते बाबासाहेबांच्या विरोधातील प्रचारात उतरले होते. तेव्हापासून डावे आणि आरएसएस यांची मनं जुळली. ती परिस्थिती आम्ही आत्ता कुठे बदलत आहोत," असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. 


"आम्ही सत्तेत दिसू"


आमचा लढा मनुस्मृतीच्या विरोधात असल्याचं लोकांना आता समजत आहे. यापुढे आम्ही सत्तेत दिसू. सत्तेसाठी आम्ही तत्वं सोडली नाहीत असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.