अमित देशपांडे, झी मीडिया, वर्धा : दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटरवरून महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी केलेल्या जिल्ह्यांची नावे व कर्जमाफी केलेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी पोस्ट केली. मात्र, वर्धा जिल्ह्याचं त्यात नावच नसल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरून महाराष्ट्रातले कर्जमाफी केलेले जिल्हे आणि आणि शेतकऱ्यांची  आकडेवारी जाहीर केली. मात्र, ही यादी जाहीर करताना वर्धा जिल्ह्यातं नाव टाकायला विसरले की काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या यादीत नाव नसल्यानं वर्धा जिल्ह्यातील शेतकरी गोंधळात आहेत.


जिल्ह्यात ५३ हजार १८० कर्जबाजारी शेतकरी आहेत. त्यांच्यावर ९०० कोटीचे कर्ज थकीत आहे. मुख्य म्हणजे विदर्भातील शेतकरी आत्महत्यांमधील प्रमुख जिल्हा वर्धा असताना जिल्ह्याचं नाव कसं सुटलं? असा प्रश्न शेतकरी नेते विचारतायत. 


या सगळ्या प्रकाराबाबत जिल्हा अग्रणी बँकेच्या प्रबंधकांना विचारलं असता त्यांनी हा प्रकार नजर चुकीतून झाला असावा, अशी प्रतिक्रिया दिलीय. 


आता वर्धा जिल्ह्याचं नाव यादीत समाविष्ट होतं की नाही? याकडे सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय.