बारामती : विद्याप्रतिष्ठान माहिती व तंत्रज्ञान विभाग संचलित वसुंधरा वाहिनी मार्फत जिल्हा परिषद शाळा मोरेवाडी येथे दरवर्षी एक घास चिऊचा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून  पक्षांसाठी एक एक मूठ धान्य जमा केले जाते. मागील शैक्षणीक वर्षापासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. पहिली ते चौथी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांचा या उपक्रमात समावेश असतो. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबरच सामाजिक  मूल्यांची व निसर्ग संवर्धनाची जाणीव निर्माण होण्याच्या उद्देश्याने या उपक्रमाची वाहिनी मार्फत सुरूवात करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या उपक्रमाच्या माध्यमातून १३ एप्रिल या दिवशी मेरेवाडी शाळेकडून ७० किलो धान्य जमा झाले. हे धान्य वसुंधरा वाहिनीचे केंद्रप्रमुख युवराज जाधव यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. दरम्यान, इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वसुंधरा वाहिनीमार्फत एक कडुनिंबाचे झाड देण्यात आले होते. आज त्या सर्व झाडांची लागण देखील प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या घराच्या परिसरात केल्याची माहिती विद्यार्थांनी मनोगतात दिली. शैक्षणिक आयुष्यातील  पदार्पणाची आठवण म्हणून दिलेल्या या झाडाची जोपासना विद्यार्थ्यांच्या बरोबर त्यांचे पालकही करताना दिसतात. अशी माहिती विद्यार्थ्यांशी संवाद साधताना समोर आली. 


औपचारिक कार्यक्रमा दरम्यान विद्यार्थानी पवन ऊर्जा या विषयावर नाटिका तसेच  समूह गीते सादर केली या उपक्रामासाठी मुख्याध्यापक जीवन शिंदे व सहशिक्षिका वनिता जाधव यांनी परिश्रम घेतले. जमा झालेले धान्य वसुंधरा वाहिनी मार्फत  बारामती येथील डॉ महेश गायकवाड यांच्या निसर्ग जागर प्रतिष्ठानला चिमणी संवर्धनासाठी देण्यात आले आहे. यावेळी वाहिनीच्या महिला मंच समन्वयिका राजश्री आगम उपस्थित होत्या.