नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे भाजीपाला, कांदा बटाटा मार्केट आजपासून सुरु करण्यात आले आहे. आज मार्केटमध्ये १८० गाड्या दाखल झाल्या आहेत. भाजी मंडईत गर्दी होत असल्याने शनिवारी हे मार्केट बंद करण्यात आलं होते. चार दिवसांनंतर हे मार्केट पुन्हा सुरु करण्यात आले आहे. आता मार्केटमध्ये गर्दी होऊ नये म्हणून ठराविक गाड्या आता सोडण्यात येत आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, मसाला आणि दाणा मार्केट सुरु करण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. मसाला मार्केटमध्ये एका व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. हा व्यापारी मुंबईतील होता. त्यामुळे या व्यापाऱ्याच्या संपर्कात कोण आले, याची माहिती घेण्याचे काम सुरु आहे. कोरोना बाधित व्यापारी आढल्याने मसाला मार्केट पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


पिंपरी-चिंचवडमध्ये याचवेळेत भाजी मंडई सुरु


दरम्यान, पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने दिनांक १४ एप्रिल २०२० रोजी रात्री बारा वाजेपर्यंत शहरातील सर्व भाजी मंडई बंद करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. मात्र, आता ज्या ठिकाणी भाजी मंडई सध्या कार्यान्वित आहे. त्या ठिकाणच्या नजिकच्या मोकळ्या जागी भाजी मंडई सोशल डिस्टन्सिंगचा अंमल प्रभावीपणे करता येईल, अशा ठिकाणीच सुरु केली जाणार आहे . मात्र जागा निश्चित झाल्यानंतरच सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत भाजी विक्री सुरु केली जाईल. याबाबतचे सुधारित आदेश जारी करण्यात आले आहेत.


सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील मोकळ्या जागांची तातडीने पाहणी करुन त्या निश्चित करण्याचे आदेश  देण्यात आले आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी भाजी मंडई सध्या अस्तित्वात आहे, तेथे भाजी विक्री सुरु करता येणार नाही. फिरत्या हातगाड्यांबाबत मात्र स्वतंत्र आदेश नंतर निर्गमित करण्यात येणार आहेत. त्यामुळे फिरत्या हातगाड्यांवर भाजी विक्री तथा फळ विक्री करता येणार नाही. शिवाय इतर छोट्या टपऱ्या अथवा भाजी केंद्रांवर देखील भाजी अथवा फळ विक्री सुरू करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.