कांदा महागत असताना पालेभाज्यांचे भाव मात्र घसरले
भाजीपाला स्वस्त झाल्याने सर्वसामान्य़ांना दिलासा...
मुंबई : एकीकडे कांद्याला उच्चांकी भाव मिळत असताना पालक, मेथी, टोमॅटो, कोथिंबीर, शेपू या पालेभाज्यांचे भाव प्रचंड घसरले आहेत. यामुळे काढणी वाहतूक आणि अडतीचा खर्चही निघत नसल्यानं परभणीतील शेतकरी अडचणीत आला आहे. परभणीच्या भाजी मार्केटमध्ये मेथी 2 ते 3 रुपये जुडीने विकली जाते आहे. पालकही 2 ते अडीच रुपये जुडी, शेपुची भाजी 8 ते 10 रुपये किलो तर कोथिंबीर 8 ते 10 रुपये किलो म्हणजे अडीच रुपये जुडी प्रमाणे विक्री होते आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या संतप्त भावना व्यक्त करीत आहेत.
दुसरीकडे कांद्याचे भाव कमी होण्य़ाचं नाव घेत नाही आहेत. कांदा अनेक ठिकाणी 200 रुपये किलोने विकला जात आहे. उन्हाळी कांदा बाजारात भलताच भाव खाऊ लागला आहे. नगरच्या घोडेगाव बाजार समितीत कांद्याला विक्रमी भाव मिळाला आहे. घोडेगाव बाजार समितीत कांदा २० हजार रुपये क्विंटल भावानं विकला गेला आहे.
कांदा सध्या चांगलाच भाव खातो आहे. फक्त बाजारातच नाही तर सोशल मीडियावर ही कांद्याची चर्चा आहे. उन्हाळी कांदा दोनशे रुपये किलोवर तर लाल कांद्यानं शंभरी गाठली आहे.
कधी नव्हे कांद्याला विक्रमी भाव मिळतो आहे. मात्र असं असलं तरी शेतकऱ्यांकडे कांदाच शिल्लक नसल्याने भाव मिळूनही कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा खिसा मात्र रिकामाच असल्याची परिस्थिती आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चाळीत कांदाच शिल्लक राहिला नाही. विशेष म्हणजे गतवर्षी दुष्काळी परिस्थिमुळे उन्हाळ कांद्याचे अल्प उत्पादन आलं होतं.