शिर्डी : शिर्डीतल्या दुकानदारांचा पन्नास वर्षांचा न्यायालयीन लढा संपुष्टात येणारय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शासकीय जागेवर अतिक्रमण केलेल्या ४६ दुकानदरांना मोफत सर्व्हेनंबर एक मधली जागा रिकामी करावी लागतेय. १९६५ पासून साईबाबा मंदिराजवळच्या मोफत सर्व्हे नंबर एक अर्थातच त्रिकोण फूल मार्केट इथं हार-प्रसादाची दुकानं थाटण्यात आली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शासनाकडून दुकानं हटवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर १९७२ साली याबाबत प्रकरण न्यायालयात गेलं. इथं एकूण १०१ दुकानं होती, काही वर्षांपूर्वी न्यायालयाच्या आदेशानं यातली ५६ दुकानं काढली. 


नुकताच उर्वरीत ४६ दुकानांबाबत सर्वोच्च न्यायालयानं निवाडा केलाय. ११ ऑगस्टपर्यंत दुकानदारांना दुकानं स्वत:हून काढण्याचा आदेश दिलाय... तसं न झाल्यास १२ ऑगस्टला प्रशासनानं कारवाई करावी आणि तसा अहवाल तात्काळ सर्वोच्च न्यायालयाला द्यावा. यात कसूर झाल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर न्यायालयाच्या अवमान केल्याबाबत वैयक्तिक कारवाई करण्यात येईल, अशी तंबीही न्यायालयानं दिलीय. 


व्यावसायिकांच्या पुनर्वसनासाठी १५ सप्टेंबरपर्यंत जागा निश्चीत करावी, त्यांना ही जागा मान्य नसेल तर भरपाईपोटी उच्च न्यायालयात जमा असलेले सोळा कोटी रूपये १०१ दुकानदारांना भरपाई पोटी द्यावेत. यांत मोठ्या दुकानदारांना वीस तर लहान दुकानदारांना पंधरा लाख रूपये देण्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलंय.