मुंढेंसारखा आणखी एक `नायक`, भ्रष्ट कर्मचारी जागेवर निलंबित
नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शासकीय कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचं काम सुरू ठेवलं आहे.
पुणे : नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शासकीय कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचं काम सुरू ठेवलं आहे. तुकाराम मुंढे यांच्यासारखाच आणखी एक आयएएस अधिकारी आपल्या कर्तव्य दक्षतेमुळे चर्चेत येत आहे. हा अधिकारी भ्रष्ट आणि कामचुकारांना जागेवर तत्काल निलंबित करतोय. असे अधिकारी सर्वसामान्य जनतेला आवडतात, त्यांच्या तोंडून आपसूक शब्द निघतात, 'हो बरोबर, असंच केलं पाहिजे'. कारण सर्वसामान्य जनतेला सरकारी कार्यालयात वाईट अनुभव आलेले असतात.
फार मोजके अधिकारी कर्तव्यदक्ष
सर्वसामान्यांचं दु:ख समजून घेणारे अधिकारी फार थोडके बोटावर मोजण्या इतके आहेत. इतरांना फक्त जनतेपेक्षा स्वत:चे प्रश्न अलिशान जगण्याचे प्रश्न मोठे वाटतात. मात्र सरकार अशाच अधिकाऱ्यांच्या बदल्या लवकर करतं, असं माहित असूनही हे अधिकारी प्रशासन आणि शिस्त किती महत्वाची आहे, हे जिवंत ठेवण्यासाठी मोलाचं कार्य करीत आहेत.
कोण आहे तुकाराम मुंढेसारखा अधिकारी?
तुकाराम मुंढेंसारखा अधिकाऱ्याचं नाव आहे, सूरज मांढरे. सूरज मांढरे हे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी आहेत. सूरज मांढरे हे खासगी गाडीने पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कुठे कधी भेट देतील, याचा नेम नाही. सूरज मांढरे खासगी गाडीने दाखल होत असल्याने कुणालाही त्यांचा येण्याचा सुगावा लागत नाही.
ग्रामीण विकासाचा कणा मजबूत होणार
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्राम पंचायत, पंचायत समिती ही ग्रामीण विकासाची शक्ती केंद्रं आणि कणा असल्याने, तो मजबूत करण्यासाठी आणि तेथील कामचुकार आणि भ्रष्टाचारांना ठिकाणावर आणण्यासाठी सूरज मांढरे येथे थेट भेट देतात.
ते म्हणतात, हे माझं कामंच आहे
सूरज मांढरे म्हणतात, एक अधिकारी असल्याने, हे पाहणं माझं काम आहे की, नागरिकांचं काम कर्मचारी नीट करतायत किंवा नाही. यासाठी ग्रामीण भागात तळागाळापर्यंत भेट देऊन तपासणं माझं काम आहे, कर्तव्यात कसूर करणाऱ्यांना यासाठी जागीच निलंबित केल्याने, प्रशासनाच्या कामात मोठी सुधारणा होणार आहे.
आतापर्यंत २ ग्रामसेवक, १ बीडीओ निलंबित
सूरज मांढरे यांनी आतापर्यंत २ ग्रामसेवक आणि जुन्नर पंचायत समितीच्या बीडीओला निलंबित केलं आहे. संबंधित बीडीओला लाच घेतल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलं आहे. हे काम अॅन्टी करप्शन नाही, तर सूरज मांढरे यांनी केलंय.
सूरज मांढरे म्हणतात, लोकांनी कार्यक्रमात नारळ आणि फुलांचे गुच्छ देणं बंद करायला हवं, यापेक्षा कमी पैशात पुस्तक येतात, ती सत्कार समारंभात द्यायला हरकत नाही.