अमर काणे, झी मीडिया, नागपूर : मान्सूनच्या आगमनाला उशीर होणार असल्याचे हवामान विभागानं सांगितलं असताना इकडे नवतपामध्ये सूर्यनारायण विदर्भात चांगलाच तळपत आहे. नागपुरात या मोसमातील सर्वाधिक  46.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर वर्ध्यात 46.5 आणि चंद्रपूरमध्येही 46.4 आज अंश सेल्सिअस तापमान होते. पुढील दोन-तीन दिवस ही तीव्र उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भात उन्हाच्या तडाख्यामुळे सर्वजण त्रस्त झाले आहे. सोमवारीही नागपूर, वर्धामध्ये 46.5 अंशा सेल्सिअसच्या पुढे पारा होता. तसंतर यंदा एप्रिल महिन्यापासून यंदा विदर्भात पारा 46 अंशांवर गेला होता.मात्र आता  नवतपाला सुरु झाल्यापासून उन्हाची तीव्रता आणखी वाढली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सूर्य चांगलाच तळपत असून नागपुरात जनजीवन प्रभावित झाले आहे. सकाळपासूनच उन्हाचे चटके बसत बसून दुपारी घराबाहेर कामासाठी बाहेर पडणे अवघड झाल्याचं नागपुरकर शुभम धावके याने सांगितले. तीव्र उष्णमुळे एसी व कूलर फारसा उपयोग होत नाही.एसीची क्षमताही कमी पडत असल्यामुळे नागरिक त्रस्त  झाले आहेत. या तीव्र उष्ण लाटेपासून बचावाच्या दृष्टीनं नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.याबाबत डॉ.पिनाक दंदे यांनी उन्हापासून बचावासाठी  काही महत्वाच्या टीप्स दिल्या आहे.


उन्हापासून बचावासाठी काळजी


कष्टाची कामे सकाळी किंवा संध्याकाळीच करावीत
घराबाहेर जातांना  पाण्याची बाटली सतत जवळ ठेवा.  पाणी भरपूर प्यावे
उन्हापासून बचावासाठी बाहेर जाताना चेहरा सुती कपड्याने झाका.
सैल सुती कपडे वापरावे, काळ्या रंगाचे व भडक कपडे वापरू नयेत.
उघड्यावर विकले जाणारे, तळलेले पदार्थ खाऊ नये.
कुलर वा  एसीतून थेट उन्हात जाऊ नका. 
बाहेर जातांना गॉगल, टोपी आणि रुमाल वापरा.