मुख्यमंत्र्यांसमोरच भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते भिडले
विरोधकांची जनतेशी नाळ तुटल्यामुळे त्यांना ईव्हीएमसारख्या मुद्यांचा आधार घ्यावा लागतोय
नागपूर : नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश रॅलीमध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. भाजपची महाजनादेश यात्रा सुरू असताना टेलिफोन एक्सचेंज चौकात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे फडकवले. यामुळे चिडलेले भाजप कार्यकर्ते आणि काँग्रेस कार्यकर्ते हाणामारीवर उतरत एकमेकांना भिडले.
दरम्यान, विरोधकांची जनतेशी नाळ तुटल्यामुळे त्यांना ईव्हीएमसारख्या मुद्यांचा आधार घ्यावा लागतोय, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय. महाजनादेश यात्रेदरम्यान नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. विरोधक भरकटल्याची टीका यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलीय.
ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. अध्यादेश समजून न घेता भाष्य केल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत. भाजपाची ही महाजनादेश यात्रा ही संवाद यात्रा असून या माध्यमातून पाच वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणालेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा आज तिसरा दिवस आहे. नागपूर मुक्कामी असलेली यात्रा आज भंडारामार्गे प्रवास करत गोंदिया इथं पोहचणार आहे. त्यानंतर भंडारा आणि तुमसर इथे दुपारी जाहीर सभा आहेत. दिवसभरात गोंदिया इथे रात्री ७.३० वाजता जनसभा आहे. तत्पूर्वी नागपूरमधून बाहेर पडतांना मुख्यमंत्री रोड शो करत बाहेर पडणार आहेत. तेव्हा कालच्याप्रमाणे रोड शोला मोठा प्रतिसाद बघायला मिळणार आहे.