आता आकाशातून पाहा सोन्याची जेजुरी; पॅरा मोटरिंगद्वारे घ्या खंडोबाचे दर्शन; पाहा Video
Jejuri Para Motoring : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाचे आता थेट हवेतून दर्शन घेता येणार आहे. पॅरा मोटरिंगद्वारे जेजुरी गड आणि त्याचा आसपासचा परिसर आता आकाशातून भाविकांना पाहता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे याच्यासंदर्भातील सर्व परवानग्या घेण्यात आल्याची माहिती प्रकल्प सुरु करणाऱ्यांनी दिली आहे.
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या (Jejuri) खंडोबाच्या (Khandoba) दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. पण आता भाविकांना जेजुरीच्या खंडेरायाचे हवाई दर्शन देखील करता येणार आहे. जेजुरी गडावर आता पॅरा मोटरिंगद्वारे (Para Motoring) दर्शन करता येणार आहे. जेजुरी परिसरातील स्थळ्यांचे भाविकांना आणि पर्यटकांना आकाशतूनही अगदी सहज सुरक्षितपणे दर्शन घेता यावे म्हणून जेजुरी गडावर पॅरा मोटरिंग सुरू करण्यात आली आहे.
या पॅरा मोटरिंगमधून तुम्ही जेजुरी गडाचे दर्शन करू शकता. सात मिनिटात पूर्ण जेजुरी आकाशामधून तुम्ही पाहू शकता. भाविकांदेखील या उपक्रमाला पसंती दिली आहे. आकाशातून जेजुरी पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करत आहेत. एक वेगळा उपक्रम जेजुरीत सुरू झाल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पुरंदरचे भूमिपुत्र असलेले कर्नल प्रशांत काकडे आणि चैतन्य ढोमसे यांनी फ्लाईंग रहिनो मोटोरिंग या अनोख्या प्रोजक्टद्वारे नव्या उद्योग क्षेत्रात पाऊल टाकले आहे. यासाठी स्पेनमधून फ्लाईंग मशिन आणण्यात आली आहे. या अत्याधुनिक अशा पॅरा मोटरिंग उपकरणाद्वारे हवाई फेरीचा आनंद घेता येणार आहे. हा प्रकल्प सुरु झाल्यापासून अबाल वृद्धांपासून ते बाल वर्गापर्यंत सगळेच जण याचा आनंद घेताना दिसत आहेत.
मात्र यासाठी अनुभवी अशा आर्मी कमांडोचे तंत्र कौशल्य वापरण्यात आले आहे. बाराव्या शतकातील उत्तम स्थापत्य बांधकामातील अस्टकोनी गडाचे विहंगम दर्शन आकाशातून घेता येते. या बाबत सर्व अधिकृत परवाने दिल्ली येथून घेण्यात आल्याची माहिती प्रशांत काकडे यांनी सांगितली.
पॅरामोटरचा वापर फक्त मैदानी भागात केला जातो. पॅरामोटरमध्ये प्रवाशाला सोबत नेले जाऊ शकते. पॅरामोटरमध्ये मोटारमध्ये बसावे लागते. या मोटारद्वारे हवेत उडण्यास मदत होते. मोटार एका तासात चार ते पाच लिटर पेट्रोल वापरते. सहसा याद्वारे 25 ते 30 किलोमीटरचे अंतर कापता येते.
पाहा व्हिडीओ -
विश्वस्त मंडळावरुन नवा वाद
जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी दरवर्षी सुमारे 80 ते 90 लाख भाविक येत असतात. भाविकांची संख्या लक्षात घेऊन त्यांना सोयी सुविधा देण्यासाठी व प्राचीन खंडोबा गडाचे संवर्धन करण्यासाठी शासनाकडून निधी देखील देण्यात आला आहे. मात्र आता खंडोबा देवस्थानावर बाहेरचं विश्वस्त मंडळ नेमल्याने जेजुरीत असंतोष निर्माण झाला आहे. गावकऱ्यांना मात्र हा निर्णय मान्य नसल्याचे म्हटलं आहे. श्री मार्तंड देवसंस्थान समिती या न्यासावर पुणे सहधर्मादाय आयुक्तांनी सात विश्वस्तांची निवड केली होती. मात्र नेमण्यात आलेले सातपैकी पाच विश्वस्त जेजुरी बाहेरील असल्याने गावकऱ्यांनी आपला राग व्यक्त केला आहे.