Gateway of India Boat Accident: मुंबईतील समुद्रात मोठी दुर्घटना घडली आहे. गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली आहे. गेट वे ऑफ इंडिया जवळच्या समुद्रात ही दुर्घटना घडली आहे. बोटीमध्ये एकूण 80 प्रवासी प्रवास करत होते अशी माहिती आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून, 21 जण जखमी झाले असल्याची माहिती आहे. दरम्यान बोटीच्या मालकाने केलेल्या दाव्यानुसार, नौदलाच्या स्पीड बोटने बोटीला धडक दिल्याने ही दुर्घटना झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

80 जणांना घेऊन जाणाऱ्या फेरीतून घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एकाचा मृत्यू झाला आहे, तर 73 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. पाच ते सात प्रवाशांचा अद्याप शोध लागलेला नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.



गेट वे ऑफ इंडियावरुन एलिफंटाला जाताना निलकमल नावाची बोट उलटली आहे. बोटीचे मालक राजेंद्र पट्टे यांनी सांगितलं आहे की, "बोट एलिफंटाला जात असताना तेथून नेव्हीची एक स्पीट बोट जात होती. त्यांनी बोटीला एक राऊंड मारला. परत गेल्यानंतर त्यांनी आमच्या बोटीला धडक दिली आणि दुर्घटना घडली".


'स्पीड बोटने धडक दिल्याने दोन तुकडे'


"3.15 वाजता बोट निघाली होती. बोटीत 80 लोक होते. बोटीची 84 लोकांची क्षमता आहे. पण ती 130 प्रवासी घेऊन जाऊ शकत होती. बोटीत लाईफ जॅकेट्स होते. सुरक्षेचे सर्व नियम पाळण्यात आले होते. बोटीला धडक दिल्याने दोन तुकडे झाले," असंही त्यांनी सांगितलं आहे. 


 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट


"एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल या बोटीचा अपघात घडल्याचे वृत्त प्राप्त झाले. नौदल, कोस्टगार्ड, पोर्ट, पोलिस पथकच्या बोटी तातडीने मदतीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. जिल्हा आणि पोलिस प्रशासनाशी सातत्याने आम्ही संपर्कात असून, सुदैवाने बहुसंख्य नागरिकांना वाचविण्यात आले आहे. तथापि अजूनही बचावकार्य सुरू आहे. बचावकार्यासाठी सर्व त्या यंत्रणा तैनात करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत," अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 



उर्वरित प्रवाशांची सुटका करण्याचं काम सुरू आहे. भारतीय नौदल, जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए), तटरक्षक दल, यलो गेट पोलिस स्टेशन आणि मच्छिमार यांच्या तीन पथके बचावकार्यात सहभागी आहेत. गेटवे ऑफ इंडियाच्या पूर्वेला असलेल्या एलिफंटा लेण्यांकडे जाण्यासाठी लोक सार्वजनिक फेरीचा वापर करतात.