VidhanSabha Election : मुंबईत ठाकरे गट `मोठा भाऊ`? मुंबईत हव्यात 36 पैकी 25 जागा?
Maharastra Politics : शिवसेना ठाकरे गटाने आता आगामी विधानसभेसाठी (VidhanSabha Election) जोरदार तयारी सुरू केलीय.. ठाकरेंच्या शिवसेनेचं लक्ष खास करून मुंबईतल्या (Mumbai) जागांवर आहे. ठाकरे गटाने मुंबईतल्या किती आणि कोणत्या जागांवर दावा केलाय? पाहुया या संदर्भातला एक सविस्तर रिपोर्ट
Mumbai VidhanSabha Election : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर शिवसेना ठाकरे गटाचा आत्मविश्वास दुणावलाय. खास करून मुंबईमध्ये लोकसभेला 3 खासदार निवडून आल्यानं आता ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीसाठी दंड थोपटल्याचं पाहायला मिळतंय. राज्यभरातील जागांची चाचपणी ठाकरेंनी सुरू केलीय. मात्र त्यांची खास नजर आहे ती मुंबईतल्या जागांवर... विधानसभेला शिवसेना ठाकरे गट मुंबईतील 36 पैकी किमान 25 जागा लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळतेय. अनेक नव्या चेह-यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून संधी मिळणार असल्याचं बोललं जातंय. ठाकरे गट मुंबईतील कोणत्या जागांसाठी आग्रही आहेत पाहूयात ...
मुंबईत ठाकरे 'मोठा भाऊ'?
शिवडी ,भायखळा, वरळी, माहीम, चेंबूर, भांडुप पश्चिम, विक्रोळी, मागाठाणे, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, अंधेरी पूर्व, कुर्ला, कलिना, दहिसर, गोरेगाव, वर्सोवा, वांद्रे पूर्व, विलेपार्ले, कुलाबा, वडाळा, चांदिवली, बोरिवली, मलबार हिल, अणुशक्ती नगर, मानखुर्द शिवाजीनगर या 25 जागेवर ठाकरे गट दावा करू शकतं.
दरम्यान, ठाकरे गटानं 25 जागा मागितल्याची माहिती आपल्याकडे नाही. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्य़े जागावाटपाबाबत सविस्तर चर्चा होईल, असं काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. लोकसभेला मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने 4 जागा लढवल्या, त्यापैकी 3 जागांवर विजय मिळवलाय.
लोकसभेला दमदार कामगिरी
मुंबई दक्षिणमध्ये अरविंद सावंत यांनी विजय मिळवला होता. तर मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात अनिल देसाई यांनी बाजी मारली होती. तर मुंबई उत्तर पूर्वमध्ये संजय दिना पाटील विजयी झाले. एवढंच नाही तर मुंबई उत्तर पश्चिममध्ये अमोल किर्तीकरांचा केवळ 48 मतांनी निसटता पराभव झाला होता.
लोकसभा निवडणुक, मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ तसंच विधान परिषदत निवडणुकीत मिळवलेल्या यशानंतर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मोठा उत्साह आहे. महाविकास आघाडीत ठाकरेंची बार्गेनिंग पावर वाढलीय. त्याचा त्यांना विधानसभेला नक्कीच फायदा होईल, असा अंदाज आहे.