राजकारणात कोणीच कुणाचा कायमचा शत्रू आणि मित्र नसतो; अजित पवार यांच्या वादावर शिवतारे यांचे सूचक वक्तव्य
राजकारणात कोणीच कुणाचा कायमचा शत्रू आणि मित्र नसतो असे सूचक वक्तव्य विजय शिवतारे यांनी केले आहे. यामुळे बारामतीत सुरु असलेल्या वादावर पडदा पडणार असल्याचे दिसत आहे.
Baramati Loksabha Election : बारामतीत सुरु असलेल्या राजकीय नाट्यावर लवकरच पडदा पडण्याची शक्यता आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांविरोधात रणशिंग फुंकणा-या विजय शिवतारे तलवार म्यान करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. राजकारणात कोणीच कुणाचा कायमचा शत्रू आणि मित्र नसतो असे सूचक वक्तव्य विजय शिवतारे यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवतारेंची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यात समेट घडवून आणला. जवळपास अडीच तास ही बैठक सुरु होती. राजकारणात कोणीच कुणाचा कायमचा शत्रू आणि मित्र नसतो असं सूचक विधान यानंतर विजय शिवतारेंनी केले. दरम्यान, शिवतारे लवकरच प्रचारात सहभागी होतील असा विश्वास सुनिल तटकरेंनी व्यक्त केला आहे.
मतदार संघातील लोकांच्या भावना या मी तिघांना कळवल्या आहे. उद्या मी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. बैठकीमध्ये काय झालं त्याची सगळी माहिती उद्या कार्यकर्त्यांसमोर मांडणार आहे असे शिवतारे म्हणाले. बैठकीत अजित दादांनी काय सांगितलं यावर बोलताना शिवतारेनी हात जोडले.
विजय शिवतारे ठाम राहिल्यास त्यांच्यावर कारवाईचे संकेत
बारामतीमधून निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर विजय शिवतारे ठाम राहिल्यास त्यांच्यावर कारवाईचे संकेत शिंदेंच्या शिवसेनेनं दिले होते. युतीधर्म पाळायचा आहे मात्र कुणी वेगळा विचार केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असं सुतोवाच भरत गोगावले यांनी केले होते.
महादेव जानकरांना बारामतीतून उमेदवारी देणार?
महादेव जानकरांना पुन्हा आपल्यासोबत घेण्यात महायुतीला यश आलंय. आता त्यांना बारामतीतून उमेदवारी देऊन मोठी राजकीय खेळी केली जाण्याची शक्यता आहे. बारामतीत सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवरून विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील नाराज आहेत. राहुल कूल यांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. या नाराजांची नाराजी दूर करायची असेल तर जानकर पर्याय असू शकतात. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळू शकते.