शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : लातूर जिल्हा अजूनही चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहे. अनेक जण देवाला पावसासाठी प्रार्थना करत आहेत. तर कधी होम-हवन-यज्ञाच्या माध्यमातून चांगल्या पर्जन्यासाठी देवाला साकडं घालत आहे. त्यात आता शाळकरी विद्यार्थी ही मागे राहिले नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लातूरच्या प्रभुराज प्रतिष्ठानतर्फे संभाजी नगर येथील अंगणवाडी येथील चिमुकल्यांनी 'धोंडी.. धोंडी...पाणी दे' अशी गीते गाऊन पावसाला आर्जव करीत, वरुण राजाला साकडं घातलं आहे. गेल्या काही वर्षापासून वरुण राजाने लातूर जिल्ह्याकडे अक्षरशः पाठ फिरविली आहे. 


परिणामी, सततचा दुष्काळ, नापिकी, शेतकरी आत्महत्या, पाणी टंचाईमुळे सर्वच जण हवालदिल झालेले आहेत. त्यामुळे प्रभाग १३ च्या संभाजी नगर येथील बाल गोपाळांनी वरुण राजाला, पावसाची गाणी गात साकडं घातलं आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी हातात कडुलिंबाच्या झाडाचा पाल घेत धोंडी धोंडी पाणी दे, येरे येरे पाऊसा तुला देतो पैसा पैसा अशी गाणी म्हणत संभाजीनगर परिसरात फेरफटका मारत वरुण राजाला साकडं घातलं. यासाठी प्रभुराज प्रतिष्ठानचे अँड. अजय कलशेट्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता.