Harishchandragad : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी आता काहीच दिवस उरले आहेत. त्यामुळे अनेकांनी यासाठी काही खास प्लॅन केले आहेत. अनेकांनी या सेलिब्रेशनसाठी जोरदार तयारी देखील केली आहे. त्यासाठी कुठे जायचं आणि कसे नव वर्षाच्या स्वागत करायचे याच्या योजना देखील अनेकांनी आखल्या आहेत. मात्र काही जण गडकिल्ले, टेकड्या, शहरालगतचे वनक्षेत्र यांना पसंती देत असतात. शहरापासून जवळ असलेल्या किल्ल्यांवरही अनेकजण नववर्षाला निरोप देण्यासाठी जात असतात. मात्र यावेळी काही हुल्लडबाजांकडून तिथल्या वास्तूचे नुकसान होईल किंवा तिथल्या पावित्र्याला ठेच पोहोचेल असं काही कृत्य करत असतात. त्यामुळे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला गडकिल्ल्यांवर पार्ट्या करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण पर्यटन किल्ले परिसरामध्ये धुडगूस घालत असतात. अनेक ठिकाणी दारू पिऊन पर्यटक गोंधळ घालतात. हे टाळण्यासाठी पर्यटकांचा कायमच पसंतीस उतरणारा हरिश्चंद्रगड 31 डिसेंबर रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून तरुणाईकडून अशा किल्ल्यांवर जाऊन नववर्षाचे सेलिब्रेशन करण्याचे प्रकार घडत आहेत. यावेळी नवीन वर्षाच्या स्वागताच्या नावाखाली अनेकजण मद्यपार्ट्या आणि अमली पदार्थांचे देखील सेवन करतात. यामुळे तिथल्या किल्ल्याच्या परिसरातील लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आता 31 डिसेंबर रोजी पर्यटकांना हरिश्चंद्रगडावर जाता येणार नाही.


31 डिसेंबर रोजी हरिश्चंद्रगड बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक ग्रामस्थांनी घेतला आहे. अकोले तालुक्यातील पाचनई गावाने घेतलेला हा निर्णय सर्वांना समजावा म्हणून सोशल मीडियावर पोस्टर्स तयार करण्यात आले आहेत. किल्ला बंद असतानाही पर्यटकांनी जबरदस्ती इथे पर्यटन करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना पाच हजार रुपयांचा दंड करण्यात येणार असल्याचा निर्णय ग्राम समितीने घेतला आहे. "31 डिसेंबर रोजी हरिश्चंद्रगड बंद. कुणीही जबरदस्ती प्रवेश केल्यास गावपातळीवर 5000 रुपये दंड आकारण्यात येईल," असे या पोस्टर्समध्ये म्हटलं आहे.


हरिश्चंद्रगडाविषयी...


हरिश्चंद्रगड किल्ला हा महाराष्ट्रातील अहमदनगर भागातील सर्वोत्तम डोंगरी किल्ल्यांपैकी एक आहे. हे ट्रेकिंगचे लोकप्रिय ठिकाण असून देश-विदेशातील पर्यटक येथे ट्रेकिंगसाठी येतात. या परिसराची विलक्षण दृश्ये पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात. हरिश्चंद्रगडाचे मुख्य आकर्षण म्हणजे कोकणकडा आहे. कोकणकड्याची रचना बाल्कनीसारखी असून पावसाळ्यात त्याचे सौंदर्य वाढते. जर तुम्ही अजून हरिश्चंद्रगड पाहिला नसेल तर फेब्रुवारी महिन्यात तुम्ही इथे फेरफटका मारू शकता.


टेकडी कापून हरिश्चंद्रगड मंदिर बांधण्यात आले आहे. हा डोंगरी किल्ला अतिशय प्राचीन असून अहमदनगर, महाराष्ट्रातील माळशेज घाटावर 1,422 मीटर उंचीवर आहे. हा डोंगरी किल्ला त्याच्या अनोख्या नैसर्गिक सौंदर्यासाठी देशभर लोकप्रिय आहे. पर्यटक इथून आसपासच्या दृश्यांचा आनंद घेऊ शकतात. हरिश्चंद्रगडमध्ये तीन प्रमुख पर्यटन स्थळे आहेत. ज्यामध्ये मंदिराचाही समावेश आहे.