वारकऱ्यांची `विठाई` आजपासून एसटीच्या ताफ्यात दाखल
खासगी वाहनांकडून होणारी आर्थिक लुटही थांबेल.
मुंबई: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी सोमवारपासून नवीन बससेवा सुरू करण्यात आली आहे. विठाई नावाच्या बससेवेचे लोकार्पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होईल. महामंडळाने खास पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी विठाई ही नवीन बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. आषाढी यात्रेत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी प्रवाशांसाठी आरामदायी बस आणण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आता या बसचे आज उदघाटन होईल. सुरुवातीला दहा बस वारकऱ्यांच्या सेवेत दाखल होतील. दापोडी (पुणे) येथे या बसची निर्मिती करण्यात येत आहे. एसटीच्या प्रत्येक विभागात ही विठाई बस लवकरच दाखल होणार आहे. या बसमधून एकावेळी ४२ प्रवासी प्रवास करु शकतील.
या बसने प्रवास करणाऱ्या भाविकांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्थाही एसटीकडूनच देण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे. एकाच पॅकेजमध्ये ‘प्रवास, राहणे व जेवण’ या तिन्ही गोष्टी समाविष्ट असल्याने भाविकांची गैरसोय टळणार आहे. अत्यंत माफक दरात ही सेवा मिळेल. त्यामुळे खासगी वाहनांकडून होणारी आर्थिक लुटही थांबेल.
पंढरपूरला जाणाऱ्या भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा या हेतूने ‘विठाई’ ची रचना आकर्षक बनवली आहे. बसच्या बॉडीवर विठ्ठल आणि वारकरी यांचे चित्र आहे. पांढऱ्या आणि लाल रंगात ती उठून दिसते. आतमध्ये आरामदायी आसन व्यवस्था आहे. खिडक्या मोठ्या आणि हवेशीर आहेत. तसेच नियमित बसपेक्षा याची उंची वाढवली आहे. याशिवाय अॅल्युमिनियमऐवजी पोलादी पत्र्याचा वापर करण्यात आला आहे.