नितेश महाजन, झी मीडिया, जालना : महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजेच पंढरपुरचा विठ्ठल. आषाढी एकादशीनिमित्त लाखों वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरला येत असतात. मात्र विठुरायाच्या ज्या भक्तांना पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जाणं होत नाही अशा भक्तांसाठी जालना जिल्ह्यातील वाटूर येथे विठुरायाचं दर्शन घडणार आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने वाटुर येथे विठ्ठलाची 51 फुटांची 3 मजली ईमारतीएवढी ऊंच मूर्ती साकार होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जालना जिल्ह्यातील वाटूर गावात महाराष्ट्रातील सर्वात मोठी विठुरायाची मूर्ती साकारत आहे. या मूर्तीची ऊंची आहे तब्बल 51 फूट म्हणजे साधारणतः 3 मजली इमारती एवढी ऊंच आणि भव्यदिव्य ही मूर्ती असणार आहे. आषाढी एकादशी जवळ येताच पंढरपूरच्या वारीची लगबग सुरु होते. जय हरी विठ्ठल आणि माऊलीचा जयघोष करत वारकरी मंडळी पंढरपूरकडे रवाना होतात. मात्र विठुरायाच्या हजारो भक्तांना दरवर्षी पंढरपूरला जाणं शक्य होत नाही. त्यामुळे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीनं वाटूरला विठ्ठलाची 51 फूट उंच मूर्ती साकारत आहे.


तब्बल तीन महिन्यांपासून या मूर्तीचं काम दिवसरात्र सुरु आहे. लोखंडी अँगल्स आणि ग्लास फायबरद्वारे ही मूर्ती बनवण्यात येत आहे. येणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्त या विठ्ठलाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून भक्तांना दर्शनासाठी ही मूर्ती खुली करण्यात येणार आहे. त्यामुळं वारकरी आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी जाता न आलेले हजारो भक्त येथे दर्शन घेऊ शकणार आहेत.



एवढी भव्य दिव्य आणि आकर्षक मूर्ती तयार होत असल्याने वाटूर पंचक्रोशीतील विठ्ठल भक्त आताच मूर्ती बघण्यासाठी गर्दी करू लागले आहेत.  ज्या भक्तांना विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाता येणार नाही. त्यांना याच विठुरायाच्या मूर्तीच्या पायावर डोकं ठेऊन दर्शन घेता येणार हे नक्की.