यवतमाळ : यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी दोन प्रमुख उमेदवारांमध्ये मतदारांच्या पळवापळवीसाठी धुमशान सुरु झाले आहे. येथे ३१ जानेवारीला मतदान होणार आहे. मात्र त्याआधीच मतांची बेरीज करून मतदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी रस्सीखेच बघायला मिळत आहे. मतदारांना सहकुटुंब पर्यटनाला पाठविण्यात येत आहे. ४८९ मतदारांना मतदानाचा हक्क बजावयचा असून ७० टक्के मतदार जनतेसाठी नॉट रिचेबल झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाविकास आघाडीने प्रत्येक तालुक्यातील मतदारांना यवतमाळमधील आलिशान हॉटेल मध्ये बोलाऊन त्यानंतर त्यांना वातानुकूलित ट्रॅव्हल्समध्ये बसवून पर्यटनाला पाठविले आहे. यात प्रत्येक ट्रॅव्हल्समध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांचे सुरक्षा कवच देखील आहे. अनेक जण उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर लागलीच विमान प्रवासाने देशाबाहेरही गेल्याचं सांगण्यात येतं आहे.


विधानपरिषदेच्या रिक्त जागेसाठी ३१ जानेवारीला पोटनिवडणूक होत असून ४ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. यवतमाळ विधानपरिषद सदस्यपदाचा कार्यकाळ ५ डिसेंबर २०२० पर्यंत असणार आहे. यवतमाळ स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून विधानपरिषदेचे आमदार तानाजी सांवत हे विधानसभेवर निवडून गेल्याने ही जागा रिक्त झाली आहे.