मुंबई : कोरोनामुळे अनेक प्रत्यारोपण शस्त्रक्रिया खोळंबल्यानं प्रतीक्षा यादीत वाढ झाली आहे. कोरोना उद्रेकामुळे गेल्या वर्षापासून मरणोत्तर अवयवदान आणि प्रत्यारोपण प्रक्रियेवरही वाईट परिणाम झाला आहे.. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात अत्यंत कमी रुग्णांवर अवयवय प्रत्यारोपण झालं. राज्यातील अवयव प्रत्यारोपण प्रतीक्षा यादी दिवसेंदिवस वाढत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात 90 जण हृदय, 48 जण स्वादुपिंड, 1 हजार 100 यकृत, तर 5 हजार 550 जण किडनीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातच आता राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. 


अनलॉकनंतर नागरिक एकदम बेफिकीर झाल्याचं चित्र आहे. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करत आहेत. नागरिकांचा विनामास्कचा वावर दिसून येतो आहे. नागरिक बिनधास्त असल्याचं दिसून येत आहेत. प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज आहे. पालिकेने मास्क न लावणा-यांविरोधात कारवाई करण्यासाठी स्पेशल मार्शल नेमले आहेत. तसंच आता त्यांच्या मदतीला पोलीसही कारवाई करताना दिसत आहेत.


काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनसाठी आठ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. मास्क हीच ढाल असल्याचं त्यांनी जनतेला आवाहन करताना स्पष्ट केलं. मात्र, जर नियम पाळले नाहीत तर पुन्हा एकदा लॉकडाऊनला समोरं जावं लागेल. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही अनेक नागरिक कोरोना नियमांचं पालन करताना दिसत नाहीयेत.


अमरावती आणि अचलपूर शहरात पुन्हा ७ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर झाला आहे. आज सायंकाळी 7 वाजल्यापासून 1 आठवडा अमरावती जिल्ह्यात कडकडीत बंद असणार आहे. कोरोनाच्या आढावा बैठकीत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी हा निर्णय घेतला. अमरावतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून झपाट्यानं कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत होती. सोबतच कोरोना संकटातही नागरिकांचा बेजबाबदारपणाही दिसून येत होता. त्यामुळे अखेर एक आठवडा लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. 


यवतमाळमध्ये कोरोना रुग्णवाढीचा विस्फोट झाला आहे. मात्र, जबाबदारीच्या दृष्टीने नागरिक आणि प्रशासन गंभीर नसल्याचं चित्र आहे. परिणामी रस्त्यांवरची गर्दी कायम असल्याचं धोकादायक चित्र आहे. असंच चित्र जर राज्यात राहिलं तर मग लॉकडाऊन अटळ आहे. हे लोकांनी लक्षात घ्यायला हवं.