वर्धा : जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री सेलसुरा इथं झालेल्या अपघातात देशाने 7 भावी डॉक्टर गमावले. सेलसुरा इथं हा अपघात झाला. अपघातात वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा मृत्यू याला. मृत्यू झालेले विद्यार्थी नेमके कुठे गेले होते, याबाबत अनेक उलटसुलट चर्चा सुरु होती. मात्र हे विद्यार्थी कुठे गेले होते, हे अखेर सीसीटीव्ही फुटेजमुळे स्पष्ट झालं आहे. या विद्यार्थ्यांपैकी एकाचा वाढदिवस होता. हा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे विद्यार्थी गेले होते. पवन शक्ती या विद्यार्थ्याचा सोमवारी वाढदिवस होता. बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी हे सर्व विद्यार्थी बाहेर गेले होते. (wardha 7 medical students cctv footage before incidents)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे 7 विद्यार्थी नागपूर-तुळजापूर महामार्गावर असलेल्या एका हॉटेलमध्ये गेल्याचं समोर आलं आहे. सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 


पवनचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी हे सर्व मित्र मोठ्या उत्साहात नागपूर-तुळजापूर महामार्गवर देवळी इसापूर इथं असलेल्या 'माँ की रसोई' हॉटेलमध्ये गेले. हॉटेलमध्ये जातानाच यांनी सोबत केकही घेतला. आपल्या मित्राचा मोठा थाटात बर्थ सेलिब्रेट करण्यासाठी सर्व मित्र उत्साही होते. सर्वच्या सर्व संध्याकाळी जवळपास सव्वा सातच्या दरम्यान गाडीतून उतरले.



गाडीतून उतरल्यानंतर या  7 जणांपैकी एकाच्या हातात केक असल्याचं दिसून येत आहे. या हॉटेलच्याबाजूला एक गार्डन होतं. तिथं ते जाऊन बसले. त्याआधी त्यापैकी एकाने हॉटेलमालकाला सोबत आणलेलं चिकन बनवायला दिलं. 


सेलिब्रेशनची सुरुवात झाली. केक कापण्यात आला. बर्थडे बॉयसोबत केक शेअर करण्यात आला. त्यानंतर हॉटेलमधून अनेक खाद्यपदार्थ मागवले. सर्वांनी मित्राचा मोठ्या जल्लोषात बर्थडे सेलिब्रेट केला. जवळपास 4 तास या मित्रांनी एकत्र वेळ घालवला. वाढदिवसाचा संपूर्ण प्लॅन जसा ठरवला होता, तसाच पार पडला. सर्व मित्र मोठ्या आनंदाने रात्री साडे अकराच्या दरम्यान बिल भरुन हॉटेलमधून बाहेर पडले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. 


भावासारख्या मित्राचा जोरात वाढदिवस साजरा केल्याचं आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर होता. हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर पुढील प्रवासासाठी मित्र निघाले. मात्र यांना पुढे काय होणार आहे, याची काडीमात्र कल्पना नव्हती. हॉटेलपासून थोड्या अंतरावर गेल्यानंतर या 7 जणांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघतात 7 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. 


मित्रांनी अखेरपर्यंत मैत्री निभावली. 'जियेगे भी साथ मरेगे भी साथ' या वाक्यानुसार या मित्रांचा अशाप्रकारे करुण अंत झाला. या मित्रांचं अशाप्रकारे जाण्याने संपूर्ण देश हादरला.  
 
मृतांमध्ये तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कार, नितेश सिंग, नीरज चौहान, प्रत्युश सिंग, विवेक नंदन, पवन शक्ती आणि शुभम जयस्वाल यांचा समावेश आहे.


या 7 जणांनी मद्यप्राशन केलं होत का?


"ते 7 जण जवळपास साडेसातच्या दरम्यान हॉटेलमध्ये आले. हे 7 जण यवतमाळच्या दिशेने आल्याचं माझ्या वेटरने सांगितलं. ते आल्यानंतर त्यांनी मला चिकन बनवण्यासाठी दिलं, जे त्यांनी सोबत आणलं होतं. त्यानुसार मी त्यांना चिकन बनवून दिलं. काही स्नॅक्सही दिले. मी स्वत: किचनमध्ये होतो. त्यांच्या गाडीमध्ये काय होतं का हे मला माहिती नाही. त्यामुळे त्यांनी मद्यप्राशन केलं होतं की नाही, याबाबत मला माहिती नाही", अशी प्रतिक्रिया हॉटेल मालक अतुल मानकर यांनी दिली.