वर्ध्यात खळबळ! 80 मेंढ्यांचा मृत्यू, मेंढपाळ शेतातून घेऊन जात असताना अचानक कोसळल्या
80 Sheep Died: वर्ध्यातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. शेतात 80 मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे.
80 Sheep Died: वर्ध्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. देवळी तालुक्यातील गिरोली येथील एका शेतात अचानक 80 मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. इतक्या मोठ्या संख्येने मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे.
वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील गिरोली येथे एका शेतकऱ्याच्या शेतात तब्बल ऐंशी मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. शेतात चरत असताना मेंढ्यांनी कपाशीची बोंडे खाल्ल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र असे असले तरी नेमके हेच कारण आहे का हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाहीये. तरी मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आले नाहीये.
गिरोली येथील शेतकरी प्रभाकर थुल यांच्या शेतात एवढ्या मोठ्या संख्येत मेंढ्याचा मृत्यू झाला आहे. मेंढपाळ आपल्या मेंढ्याना रात्री शेतातून घेऊन जात असताना अचानक एकाएकी मेंढ्यांचा मृत्यू होऊ लागला. अचानक मेंढ्या खाली कोसळू लागल्याने मेंढपाळालाही काही समजेनासे झाले. त्याने तातडीने शेतकऱ्यांला बोलवून आणले. मात्र तोपर्यंत बहुतांश मेंढ्यांचा मृत्यू झाला होता. इतक्या मोठ्या संख्येने मेंढ्यांचा मृत्यू झाल्याबाबत शेतकऱ्याने चिंता व्यक्त केली आहे. तसंच, या घटनेबाबत पशुसंवर्धन विभागाने पंचनामा केला आहे.
दरम्यान, मेंढ्यांना विषारी चाऱ्यातून विषबाधा झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मृत्यूमुखी पडलेल्या मेंढ्यांचा पंचनामा करुन त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्या शवविच्छेदन अहवालानंतरच या मेंढ्यांना विषबाधा झाली की अन्य काही कारण आहे स्पष्ट होणार आहे.
सध्या रब्बीची कोवळी पिके असून अवकाळी पावसाने सोयाबीन व इतर पिके उगवली आहेत व काही ठिकाणी शेतकरी तननाशक आणि कीटकनाशक फवारत आहेत. ही कोवळी पिक खाल्ल्यामुळे मेंढ्यांना विषबाधा झाली असावी, असा प्राथमिक अंदाज सध्या वर्तवला जात आहे. तसंच, काही जण कपाशीची बोंडे खाल्ल्याने मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचाही अंदाज वर्तवण्यात येत आहे.