राज्यपालांना पत्र दिलं होतं का? अजित पवार गटाच्या शपथविधीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा खळबळजनक दावा
राष्ट्रवादीच्या शपथविधीबाबत मुख्यमंत्री शिंदेंना अंधारात ठेवण्यात आले असा खळबळजनक दावा आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिलेलं पत्र समोर आणण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
Ajit Pawar : अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी 2 जुलै 2023 रोजी राजभवन येथे मंत्रीपदाची शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा चर्चेत आला आहे. राष्ट्रवादीसोबत झालेला शपथविधी एकनाथ शिंदेंना अंधारात ठेऊन केला गेला असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. अजित पवारांनी मंत्रिपदाची शपथ घेण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रोटोकॉलप्रमाणे राज्यपालांना पत्र दिलं होतं का? असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला आहे.
पत्र समोर आले पाहिजे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सरकारमध्ये सामील करुन घेताना त्यांना मंत्रिपदं किती द्यायची, किती महामंडळं द्यायची याविषयी झालेल्या चर्चेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरी त्यांना सामावून घेतलं की नाही? अशी शंका वाटत असल्याचे भास्कर जाधव म्हणाले. राष्ट्रवादीचे आमदार मंत्रीपदाची शपथ घ्यायला जाण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राज्यपालांना पत्र दिलं होतं का? ते सुद्धा बाहेर आलं पाहिजे”, अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली आहे. वैधानिक पद्धतीनुसार ज्या मंत्र्यांना शपथ द्यायची असते त्या मंत्र्यांची यादी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना देणं बंधनकारक असतं, असंही जाधवांनी म्हंटलं आहे.
तास-दोन तासात हा शपथविधी पार पडला
पहिल्यांदा अजित पवार आणि त्यांचा गट राजभवानवर गेला. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजभवनावर दाखल जाले. त्यानंतर सर्वात सेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभवनावर पोहचले. तास-दोन तासात हा शपथविधी पार पडला. त्यामुळे याबाबतची चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अंधारात ठेवून झाली असावी असा दावा भास्कर जाधव यांनी केला आहे.
शिंदे गटाचे आमदार संपर्कात असल्याचा दावा
शिंदे गटाचे काही आमदार संपर्कात असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. शिवसेनेत कुणीही नाराज नाही, विरोधकांकडून अफवा परसवण्याचं काम केलं जातंय अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलीय. अजित पवार आल्यानं सरकार आणखी मजबूत होईल असंही शिंदेंनी म्हंटलय. अजित पवारांच्या शपथविधीनंतर शिवसेना शिंदे गटात नाराजी असल्याचं बोललं जातंय. त्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्टीकरण दिलंय. आपला एकही आमदार मातोश्रीच्या संपर्कात नाही असाही दावा शिंदेंनी केलाय.