वाशिम: कोरोनाचं राज्यात थैमान सुरू आहे. मोठ्या प्रमाणात अमरावती, वर्धा, वाशिम जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाचा आता आरोग्य विभागाचा गलथान कारभार समोर आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात RTPCR नमुन्यांना बुरशी लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाशिम जिल्ह्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात RTPCR नमुन्यांना बुरशी लागली. जऊळका आणि शिरपूर आरोग्य केंद्रातला धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 24 फेब्रुवारीपासून घेण्यात आलेल्या 110 नमुन्यांना बुरशी लागली. एकूण 310 नमुने घेण्यात आले होते मात्र त्यापैकी बुरशीग्रस्त नमुने स्वीकारण्यास लॅबनं नकार दिला आहे. 



नमुने घेतल्यानंतर योग्य खबरदारी न घेतल्यामुळे बुरशी लागल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रातील कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभाराचा फटका नागरिकांना बसणार आहे. त्यामुळे हे सर्व नमुने आता पुन्हा घ्यावे लागणार आहेत. आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराचा फटका या सर्वांना बसणार असल्यानं संताप व्यक्त होत आहे. 


कोरोनाची आकडेवारी
अमरावतीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसून येतं आहे. अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठातील तब्बल 56 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे त्यापैकी 13 जणांच्या संपूर्ण कुटूंबाला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अमरावतीत 8 मार्च पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांनी मास्क लावण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून वारंवार करण्यात आलं आहे.