Washim Water Issue : वाशिम जिल्ह्याचे तापमान 42 अंश झाले आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाच्या चटक्याबरोबर पाणीटंचाईच्या समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे. वाढलेल्या तापमानामुळे वाशिम जिल्ह्यातील जलपातळी झपाट्याने खालावत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे काही गावात पाणी टंचाईची भीषण समस्या निर्माण झाली आहे. वाशिम जिल्ह्यातील 3 मध्यम आणि 168 लघु असे 171 जल प्रकल्प आहेत. मात्र या प्रकल्पातील पाणी पातळी खालावली असून मध्यम प्रकल्पात 19 टक्के तर लघू प्रकल्पात केवळ16 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाशिम जिल्ह्यातील 13 गावांना पाणी टंचाईची समस्या आहे. तर मालेगाव तालुक्यातील खैरखेडा गावात तीव्र पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली असल्याने येथील लहानग्यापासून तर वयोवृद्धांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. वाशिम जिल्ह्यातील खैरखेड्याचा बहुतांश भूभाग डोंगरदऱ्या आणि कडाकपारींसह खडकाने व्यापलेला आहे. स्वातंत्र्यानंतरही या गावात रस्ते, पाणी, आरोग्यासह विजेची समस्या कायम असून पाणी अडवा पाणी जिरवा, जलयुक्त शिवार, पेयजल यासारख्या महत्त्वाकांक्षी योजनांवर शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो. मात्र अद्याप खैरखेडा येथील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करणे प्रशासनाला शक्य झाले नसल्याचे वास्तव यंदाही कायम आहे. पिण्याच्या पाण्यासह कपडे धुण्यासाठी डोक्यावर हंडे-भांडे घेऊन महिला पुरुषांसह अबालवृद्धांना भर उन्हात दोन किलोमीटर अंतराचा घाट रस्ता चढून पाण्याची गरज भागवावी लागत आहे. 


डोईवर हंडा घेऊन पाण्यासाठी भटकंती


वाशिम जिल्ह्यातील खैरखेडा गावात सद्यस्थितीत भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून महिलांसह मुलांना एक कि.मी.अंतरावरुन घाटरस्ता चढून डोईवर हंडा घेऊन पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तर दुसरीकडे जनावराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाल्याने पशूपालक त्रस्त झाले आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन प्रस्तावित पाणी पुरवठा योजनेचं काम सुरु करण्याची मागणी खैरखेडा ग्रामस्थांमधून होत आहे.


गावात सार्वजनिक तथा खाजगी स्वरूपाची एकही कूपनलिका किंवा पाणवठा नाही. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वीच या गावातील जनतेची तहान दूषित पाण्यावर भागवली लागतं आहे. ग्रामस्थांना रोजमजुरीचे काम सोडून पाण्यासाठी दिवस घालावा लागत आहे. मागील अनेक वर्षापासून गावात पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण होत असल्याने सोयरं-संबंध करण्यासाठी वधू पिता धजावत नसल्याने युवकांचे लग्न होतं नसल्याचे वयोवृद्ध महिला सांगतात.


पाणी टंचाईबाबत उपाययोजना सुरू


वाशिमच्या खैरखेडा या आदिवासी आणि बंजाराबहुल गावात दरवर्षीच उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होते. ते चित्र यंदाही कायम असून घाट रस्ता चढून एक किलोमीटर अंतरावरून पाणी आणून गरज भागवावी लागत आहे. खैरखेड्यातील नागरिकांच्या डोईवरचा हंडा उतरणार तरी कधी असा सवाल यंदाही उपस्थित केला जात आहे. गाव परिसरातील दोन कि.मी अंतरावरील नदी पात्रातील विहिरीवरून पाण्यासाठी पायपीट करुन भर उन्हात जाव लागत आहे. हे चित्र बदलण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे. सध्या जिल्ह्यात पुरेसा पाणी साठा उपलब्ध असून पाणी टंचाईबाबत उपाययोजना सुरू असल्याचे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी सांगितलं आहे.