गणेश मोहळे झी मीडिया वाशिम: कोरोना लसीबद्दल अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्राकडे अनेकांनी पाठ फिरवली जात असल्याचे आपण बघतो. मात्र काही ठिकाणी लसीकरण झालेल्या नागरिकांना सकारात्मक परिणाम दिसायला लागले आहेत. वाशिममधील एका आजींची नऊ वर्षांपासून गेलेली दृष्टी लस घेतल्यानंतर परत आल्याचा दावा केला जातो आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाशिमच्या रिसोडच्या बेंदरवाडी येथे राहणाऱ्या मथुराबाई बिडवे या 70 वर्षांच्या आजीचं आयुष्य गेल्या 9 वर्षांपासून अंधारामय होतं. मोतीबिंदूमुळे बुबुळ पांढरी झाली आणि दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली. मथुराबाई या मुळच्या जालना जिल्ह्यातील परतूरच्या राहणा-या. रिसोडमध्ये त्या नातलगांकडे राहतात. त्यांनी 26 जूनला कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतला. 



लस घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एका डोळ्यांनं 30 ते 40 टक्के दिसायला लागल्याचा त्यांचा दावा आहे.आधी मथुराबाई लस घेण्यास तयारच नव्हत्या. मात्र कुटुंबीयांनी आग्रह केला आणि त्यांनी लस घेतली. त्यानंतर हा चमत्कार घडल्याचं घरची मंडळी सांगत आहेत. 


डॉक्टरांनी मात्र लस घेतल्यावर असं होण्याची शक्यता नसल्याचं म्हटलंय. या घटनेचा सखोल अभ्यास करावा लागेल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मथुराबाईंच्या अंधकारमय जीवनात प्रकाश आला असला तरी हा नेमका लसीचा परिणाम आहे की अन्य काही कारणामुळे त्यांची दृष्टी आली आहे. हे अधिक संशोधनानंतरच समजेल असंही सांगण्यात आलं आहे.