राजेश सोनोणे ,वाशिम : बीटी कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव होत नाही असा दावा बीटी कंपन्यांकडून केला जातो. त्यावर विश्वास ठेवून शेतकरी महागडे बियाणे पेरतात. पण आता बीटी बियाण्याचं वास्तव उघड होवू लागलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाशिम जिल्हयातील हिवरा-लाहेगाव परिसरातील कपाशीची पाहणी करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं पथक दाखल झालं होतं. त्याचं कारण म्हणजे या परिसरातील हजारो एकर बी.टी कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. बोंड अळीमुळं कपाशीचं शंभर टक्के नुकसान झालं आहे. याविषयी शेतक-यांनी जिल्हा कृषी विभाग आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडं तक्रार  केल्यानंतर दोन्ही विभागाच्या अधिका-यांनी संयुक्तपणे हिवरा-लाहेगाव परिसरातील शेतावर जाऊन पाहाणी केली.
  
या परिसरातील कपाशीच्या पिकावर ९० ते १००% बोडांवर अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्याचं डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी मान्य केलंय. बोंड अळीपासून कपाशीचं संरक्षण करण्यासाठी शेतक-यांनी काही गोष्टींची काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचं  शास्त्रज्ञांनी सांगीतलंय.


अमरावती, अकोला, यवतमाळ, आणि वाशिम जिल्यात प्रामुख्याने कपाशीचं पीक घेतलं जातं. बीटीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव होत नसल्याचा दावा कंपन्यांकडून केला जातो. मात्र बीटीचं वास्तव आता लपून राहिलं नाही. बोंड अळीमुळं शेतकरी हैराण झाले असून कंपन्या आणि राज्य सरकारनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी इथल्या शेतक-यांकडून केली जात आहे


गुलाबी बोण्ड अळीच्या प्रादुर्भावाविषयी  शास्त्रज्ञांकडून  अहवाल प्राप्त झाल्यावर जिल्हा प्रशासन कारवाई करणार आहे. मात्र ही कारवाई वरवरची मलमपट्टी ठरणार आहे. खरं तर बीटीला बोंड अळीपासून मुक्त करण्याची खरी आवश्यकता आहे.