... म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला उड्डणानंतर उतरवलं
पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरसोबत एक प्रकार घडला.
नाशिक : पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरसोबत एक प्रकार घडला.
नाशिकमध्ये मुक्कामी असणाऱ्या मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर उड्डाणानंतर पुन्हा खाली उतरवण्यात आलं. हेलिकॉप्टरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजन झाल्यानं एकाला खाली उतरवून दिल्यानंतर पालकमंत्री गिरीष महाजन यांच्यासह मुख्यमंत्री औरंगाबादला रवाना झाले. सारंगखेडाच्या चेतक महोत्सवाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री रात्री उशिरा नाशिक मुक्कामी आले होते.
काय घडली घटना ?
सकाळी नऊ साडेनऊच्या सुमारास नाशिकच्या पोलीस परेड ग्राउंडवरून त्यांच्यसह हेलिकॉप्टरनं उड्डाण घेतलं. मात्र, हेलिकॉप्टरमध्ये प्रवाशांची संख्या वाढल्याने हेलिकॉप्टर पुन्हा खाली उतरवण्यात आलं. दरम्यान, नाशिक मुक्कामी मुख्यमंत्र्यांनी अधिका-यांशी चर्चा करून शहरातील कामकाजाचा आढावा घेतला.
मुख्यमंत्री आणि हेलिकॉप्टर यांच्याशी निगडीत ही ३ घटना आहे. या अगोदर २ वेळा मुख्यमंत्र्यांचा हेलिकॉप्टरसोबत अपघात होता होता टळला आहे. आज ही नाशिकमधील तिसरी घटना आहे. या घटनेने घटनास्थळी एक गोंधळ निर्माण झाला. मात्र एका व्यक्तीला खाली उतरवून त्यांना गाडीने रवाना करण्यात आले.