पुणे : ऐन मे महिन्यात उन्हाचा दाह वाढत असल्यामुळे विविध अडचणी समोर येत आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची भीषण परिस्थिती ओढावली आहे.  यंदाचा दुष्काळ किती भीषण आहे याचं आणखी एक वास्तव आता समोर आलं आहे. दुष्काळामुळे नद्या, धरे आणि पाण्याचे इतर स्त्रोत आटत असतानाच उजनी धरणातील पाण्याची पातळीही कमी झाल्याची बाब उघड झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उजनी धरणातील पाण्याची पातळी इतकी खाली आली आहे की, पाण्याखाली असणारं पळसनाथाचं मंदिरही आता सहजपणे दिसू लागलं आहे. ड्रोनने हे भीषण वास्तव टिपण्यात आलं आहे. जवळपास ४० वर्षांपूर्वी हे मंदिर पाण्याखाली गेलं. पण, यंदा उजनीची पाणीपातळी कमी झाल्यामुळे हे मंदिर सर्वांच्या नजरेस पडलं आहे. छायाचित्रकार सचिन वाघ यांनी ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने दुष्काळाचं हे वेगळं चित्र सर्वांसमोर आणलं आहे. मुख्य म्हणजे एकिकडे दुष्काळाचं वास्तव या व्हिडिओमुळे समोर येत असलं तरीही अनेक वर्षे पाण्याखाली असणारं हे मंदिर पाहण्यासाठी अनेकांनी या ठिकाणाला भेटही देण्यास सुरुवात केली आहे. 


चाळीस वर्षांपूर्वी उजनीचं धरण झालं आणि त्या धरणाखाली  शेकडो गावं पाण्याखाली गेली. त्यातीलच एक गाव म्हणजे पळसदेव. पाण्याखाली गेलेल्या याच मंदिरातील हे पळसनाथाचं मंदिर. अनेक गावांना उजनीनं आपल्या उदरात घेतलं. त्यात या मंदिराचाही समावेश होता. १९७२ रोजी पाण्याखाली गेल्यानंतर जवळपास चौथ्यांदा दुष्काळाच्या दाहकतेची जाणिव करुन देत ते सर्वांच्या नजरेस पडलं आहे. 


अतिशय सुबक अशी कलाकुसर या मंदिरावर करण्यात आलेली आहे. पलास तीर्थ म्हणूनही हे मंदिर ओळखलं जातं. या हेमाडपंथी मंदिराचा ज्ञानेश्वरीतही उल्लेख आहे. य़ा भागात इतरही काही लहानमोठी मंदिरं आणि पाण्याखाली गेलेल्या मंदिरांचे काही अवशेष आता दिसण्यास सुरुवात झाली आहे. एकंदरच दुष्काळाचं भीषण वास्तव सांगण्यासाठीच हे मंदिर जणू पाण्याबाहेर आल्याची अनुभूती होत आहे. 



विकिपीडियावर उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार हे मंदिर यादवकालीन असल्याचं म्हटलं जातं. ज्याच्या आवारात सतीशिळा, वीरगळ, (भंगलेला) घोडा, मारुतीची मूर्ती, दीपमाळेचे अवशेष, भक्कम विटांची भग्न ओवरी असे अनेक अवशेष पाणी ओसरले की पाहता येतात. मंदिरासमोरची विटांची ओवरी ही फलटणकर निंबाळकरांनी बांधली होती, असंही सांगितलं जातं.