अलिबागमध्ये उन्हाबरोबरच पाणीटंचाईच्या झळा
मुंबईपासून जवळच असलेल्या या ठिकाणी पाणीटंचाई
प्रफुल्ल पवार, अलिबाग : एप्रिल महिना उजाडला की कोकणातही उन्हाबरोबरच पाणीटंचाईच्या झळा बसायला सुरूवात होते. अलिबाग तालुक्याच्या खारेपाट विभागातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे.
पाणीटंचाईमुळे हंडाभर पाणी मिळवण्यासाठी धडपड सुरु आहे. दुष्काळग्रस्त मराठवाडा किंवा विदर्भातली ही बातमी नसून मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या अलिबाग तालुक्यातल्या बोडणी गावातली ही स्थिती आहे. चारशे उंबऱ्याच्या या गावाची लोकसंख्या साधारणपणे तीन हजाराच्या आसपास आहे. मात्र गावातल्या महिलांना पहाटे चार वाजल्यापासून पाण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागते. विहीर आणि नळावर महिलांची झुंबड उडते. कधी कधी तर वाद आणि भांडणंही होतात.
रेवस प्रादेशिक नळपाणी योजनेच्या टोकावरील गावापैकी हे एक गाव. मात्र पाणीटंचाई पाचवीलाच पूजलेली. या टोकावरच्या गावांना कधीतरी पाणी पोहोचतं. नळाबरोबरच गावातील कोरडया पडलेल्या दोन विहिरींमध्ये हे पाणी सोडलं जातं. मात्र तेही पुरेसं नाही. ९० टक्के कोळीवस्ती असलेल्या गावातल्या महिला मासेविक्रीचा व्यवसाय करतात. मात्र रोजगार बुडवून त्यांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागते. पाणीच नसल्याने ग्रामस्थांना २०० रुपये देऊन पाणी विकत घ्यावं लागतं आहे.
या भागातल्या इतर गावांचीही परिस्थिती काही वेगळी नाही. त्यातच मे महिना अजून बाकी आहे. त्यामुळे महिना, दीड महिना कसा काढावा असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.