नाशिक : नाशिक विभागात सध्या एक हजाराहून अधिक टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यात सर्वाधिक बिकट परिस्थिती अहमदनगर जिल्ह्यात असून केवळ पाच टक्के पाणीसाठा धरणात शिल्लक राहिला आहे. ४६६ चारा छावण्या लावून पाळीव दूधदुभती पशुधन जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आता उपलब्ध पाण्यावरच यंदाच्या उन्हाळ्याची भिस्त असणार आहे. अपुरा पाऊस, वेगाने खालावलेली भूजल पातळी, आटलेल्या नद्या आणि तळाला गेलेली धरणे ही नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांची परिस्थिती आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वात गंभीर परिस्थिती आहे ती नगर आणि नाशिक जिल्ह्याची आहे. नगरमध्ये ७३२ टँकरने पाणीपुरवठा करत ४८३ गावे आणि २७२२ वाडयाची तहान भागविली जातेय तर धरणांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात आज २४३ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी केवळ १०४ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. आज दहा पट अधिक संख्येने जिल्हा आज तहानेने व्याकूळ झाला आहे. सिन्नरमध्ये परिस्थिती बिकट असून पंधरा वीस दिवसातून एकदा पाणी मिळतेय तर काही ठिकाणी अनेक ग्रामस्थ रस्त्यावर आले आहेत.  


नाशिक जिल्ह्यात गतवर्षी सरासरीच्या ८० टक्के पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती आहे. जळगाव जिल्ह्यात १४६ टँकर सुरु आहेत तर आदिवासी जिल्हा नंदूरबारमधे प्रथमच पहिला टँकर सुरु झाला आहे. नगर जिल्ह्यात तर साडे चारशेहून अधिक चारा छावण्यात पशुधन वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मागेल तिथे टँकर अशी प्रशासनाने भूमिका घेतली आहे.


पाऊस सुरु होण्यास किमान दीड महिना प्रतिक्षा करावी लागणार आहे. त्यात तापमान पंचेचाळीशी पार करत असल्याने जळगाव मालेगाव मनमाड परिसर अधिक अडचणीत येणार आहे. त्यामुळे गोदावरीच उगमस्थान असलेल्या या जिल्ह्यातून अर्ध्या महाराष्ट्राला पाणीपुरवठा केला जातो. त्याच ठिकाणी भविष्यात दुष्काळी भीषण परिस्थितीची संकट उभे ठाकले आहे.