Water Crisis in Maharashtraपाण्याच्या भीषणतेचं दाहक वास्तव दाखवणारी रायगड जिल्ह्यातील कर्जतमधून मोठी बातमी. कर्जत तालुक्यातल्या आदिवासी महिलांचा एक हंडा पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष सुरु आहे. ताडवाडी ही सर्वात मोठी आदिवासी वाडी आहे. मात्र एक हंडा पाण्यासाठी इथल्या आदिवासी महिला अख्खी रात्र विहिरीवर जागून काढत आहेत. ही रात्र जागून काढताना अंधारात साप किंवा विंचू चावण्याचा धोका असतो. 


घोटभर पाण्यासाठी महिला विहिरीवर रात्रीच्या मुक्कामाला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरपटणारा प्राणी दिसला की महिलांची अंधारातच पळापळ होते. यात अनेकदा त्या जखमीही होतात. मात्र तरीही जीवाचा धोका पत्करत त्या एक हंडा पाण्यासाठी संघर्ष करतात. ताडवाडीत 900 लोकसंख्या आहे.  12 हजार लीटर क्षमतेचा एकच टँकर गावात येतो. सकाळी ओतलेलं पाणी काही वेळातच संपून जाते. तेव्हा नंबर लावण्यासाठी महिला रात्रीच विहिरीवर मुक्कामाला जातात. महिला एका हंड्यासाठी रात्र विहरीवर झोपून काढत आहेत. तर रात्रीच्या अंधारात साप विंचू यांच्यात भयात पाण्यासाठी जीव धोक्यात घातला जात आहे. असे असताना शासनाकडून मंजूर झालेल्या पाणी योजनेचे अद्यापही काम अद्याप सुरुच आहे. काम धीम्या गतीने सुरु असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


आदिवासी लोकांचे पाण्यासाठी हाल 


कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील डोंगर दुर्गम भाग असलेल्या परिसरात उन्हाळ्यात पाणी टंचाईची झळ बसते. तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत हद्दीत ताडवाडी ही आदिवासी वाडी येते. साधारण 900 लोकसंख्या असलेल्या या वाडीत 250 च्यावर कुटुंब राहतात. पाणीटंचाईची झळ सध्या या वाडीला बसत आहे. उन्हाळा आता सरत असून पावसाळा तोंडावर आहे. त्यामुळे पाणीटंचाई तीव्र झाली आहे. ताडवाडी येथील आदिवासी लोकांचे पाण्यासाठी हाल सुरु झाले आहेत.


तहान भागवताना कुटुंब उपाशीपोटी...



आदिवासींची तहान भागविण्यासाठी 12 हजार लिटर पाणी विहिरीत ओतले जात आहे. मात्र, हे पाणी काही वेळात संपून जाते. त्यामुळे पाणी मिळेल या आशेने महिला रात्रीच विहिरीवर मुक्काम ठोकत आहेत. कारण विहरीवर नंबर लावण्यासाठी ही सगळी धडपड सुरु असते. घरात पाणी नसल्याने जेवणाची देखील आबाळ  होत आहे. एकीकडे पाणी नाही आणि दुसरीकडे पाण्यासाठीच सगळा वेळ जात असल्याने कुटुंबाला उपाशीही राहावे लागत आहे. अनेकवेळा उपाशीपोटी घोटभर पाण्यासाठी वनवन करावी लागत आहे.