नितेश महाजन, झी मीडिया, जालना : यंदा जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी चांगला आधार दिला असला तरी अखेरच्या टप्प्यात याच रब्बी पिकांवर संक्रांत कोसळण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात तुडुंब भरलेल्या विहिरींमध्ये पाण्याची आवक चांगलीच मंदावल्याने उशिरा पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना उत्पादनात फटका बसण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी ही पिकं जोमात आहेत. सर्वात आधी पेरलेला गहू ओंबी अवस्थेत, हरभरा घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. पण उशिरा पेरलेली ही पिकं दोन पानांच्या अवस्थेत आहेत. ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणलं. नद्या, नाल्यांबरोबर बंधारे, विहिरी तुडुंब झाले आणि याच पाण्याच्या भरवशावर शेतकऱ्यांनी गहू, ज्वारी, हरभरा अशी रब्बी पिकांची पेरणी केली.


अनेक शेतकऱ्यांनी उशिरा पेरणी केली खरी पण याच शेतकऱ्यांच्या पिकांना आता कमी पाण्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण तुडुंब भरलेल्या विहिरींची पाणीपातळी आता चांगलीच खोलवर गेली आहे. अनेक शेतकऱ्यांचा पाणीउपसा सुरु झालाय. त्यामुळे पेरलेली गहू, हरभरा, मका, ज्वारी ही पिकं जगवायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय.


जिल्ह्यातील मंठा आणि परतूर या दोन तालुक्यात रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. ७ मध्यम आणि ५७ लघु प्रकल्पातील एकूण पाणीसाठा फक्त ४४ टक्क्यांवर आलाय. गेल्यावर्षी हाच पाणीसाठा ५ टक्क्यांवर होता. यंदा पाऊस चांगला झाला असला तरी परतीचा पाऊस मुसळधार झाल्याने जमिनीत पाणी मुरलं नाही. या पावसामुळे तात्पुरता पाणीसाठा वाढला पण गेल्या काही दिवसांपासून हा पाणीसाठा झपाट्याने कमी व्हायला लागलाय.


पाऊस कितीही पडला तरी त्याचा परिणाम हा तात्पुरत्या जलवाढीवर होतो. तो निरंतर टिकत नाही. पण पडलेल्या पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात साठवलं जाऊन त्याचा सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून वापर केला तर पिकांना मोठं जीवदान मिळू शकतं. शिवाय उत्पादनातदेखील वाढ होऊ शकते. त्यामुळे कितीही पाऊस झाला तरी पाण्याचा काटकसरीने वापर करावाच लागेल जेणेकरून येणार पाणी संकट दूर करता येईल.