पाणीपुरवठा स्मार्ट : नळ कनेक्शनला लावणार मीटर, वॉटर ऑडिट होणार
नळ कनेक्शनला मीटर देखील बसविण्यात येणार
अहमद शेख, झी २४ तास, सोलापूर : सोलापूर शहरात पाणी पुरवठा योग्य पद्धतीने करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे स्मार्ट सिटीअंतर्गत विविध उपाय योजना सुरु आहेत. याचाच भाग म्हणून शहरात वॉटर ऑडिट करण्यात येणार आहे. अनेक वर्ष जुनी पाईपलाईन, त्यामधून होणारी गळती, पाण्याची होणारी चोरी या कारणांमुळे सोलापूरकरांना नेहमीच पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं. यातून सोलापुर करांची सुटका होणार आहे. मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी यासंदर्भात माहिती दिली.
पावसाळ्यात मुबलक पाणी साठी असताना देखील दररोज पाणी पुरवठा करता येऊ शकत नाही. मात्र यावर उपाय म्हणून स्मार्ट सिटीच्या माध्यमातून उजनीपासून ११० एमएलडीची नवीन पाईपलाईन टाकली जात आहे. ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत काम पूर्ण झाल्यानंतर सोलापूरकरांना दररोज पाणी मिळणे शक्य होणार आहे.
सोलापुरात कोण किती पाणी वापरतं, कुठे अवैध नळाचे कनेक्शन आहेत, जुन्या पाईपलाईनमुळे होणारी पाण्याची गळती यामुळे पाणी पुरवठ्यासाठी उपाययोजना करताना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं. यासगळ्याची माहिती मिळण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत वॉटर ऑडिट करण्यात येणार आहे.
यामुळे कोणत्या परिसराला किती दबावाने पाणी द्यावे लागेल याची देखील माहिती मिळणे शक्य होणार आहे. वॉटर ऑडिट झाल्यनंतर मिळालेल्या अहवालानुसार प्रत्येक नळ कनेक्शनला मीटर देखील बसविण्यात येणार आहेत. यामुळे पाण्याच्या वापरावर नियंत्रण ठेवणे शक्य होऊ शकणार आहे.
वॉटर ऑ़डिट करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत टेंडर काढण्यात आले असून आठवडा भरात त्याचे टेंडर निघतील. ऑडिडसाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
वॉटर ऑडिटचा अहवाल प्राप्त झाल्यनंतर पहिल्या टप्यात एबीडी एरियामध्ये स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहेत. वर्षभरात संपूर्ण शहरात अशा पद्धतीने नळ कनेक्शनसाठी मीटर लावण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती सोलापूर आयुक्तांनी दिली.