वादळ पुढे सरकलं आता मान्सूनचं काय? महाराष्ट्रातील पर्जन्यमानाविषयी हवामान खात्यानं स्पष्टच सांगितलं
Weather Update : आकाशातील काळ्या ढगांनी हुरळून जाऊ नका. कारण, मान्सून लांबणीवर पडलाय. आता तो नेमका कधी सक्रिय होणार याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे.
Weather Update : 'बिपरजॉय' चक्रिवादळानं आता पुढील रोखानं प्रवास सुरु केला असून, हे वादळ राजस्थानच्या दिशेनं पुढे जाताना दिसत आहे. सध्याच्या घडीला या वादळाचा लँडफॉल सुरू झाला असून, त्या पार्श्वभूमीवर उदभवणाऱ्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर सौराष्ट्र, कच्छ, द्वारकेत प्रशासनानं सर्वतोपरी तयारी केल्याचं पाहायला मिळत आहे. इथं महाराष्ट्रासह मुंबईच्या किनारपट्टी भागातही वादळाचे स्पष्ट परिणाम दिसून येत आहेत.
आतापर्यंत या वादळानं वादळामुळे गुजरातमध्ये 22 जण जखमी तर 23 जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे तर, जवळपास 940 गावातील विजपुरवठा खंडीत झाला आहे. साधारण ताशी 140 किमी इतक्या वेगानं हे चक्रिवादळाचे वारे वाहत असून, त्यामुळं गुजरातच्या कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर या भागांमध्ये समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळणार असून, इथं पूरसदृश परिस्थिती निर्माण होईल अशीही शक्यता वर्तवली जात आहे. (weather Monsoon updates cyclone Biparjoy in maharashtra )
देशातील कोणत्या राज्यांवर चक्रिवादळाचे परिणाम?
पुढील चार दिवसांपर्यंत चक्रिवादळामुळं गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात पावसाची हजेरी असेल. तर, मध्य प्रदेशात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळेल. देशाच्या अती उत्तरेकडे म्हणजेच हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये वादळाचे थेट परिणाम दिसून येत नसले तरीही या भागांमध्ये पर्वतीय क्षेत्रांवर हिमवृष्टी आणि काही भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते.
महाराष्ट्रातील मान्सून लांबणीवर, हवामान खात्यानं स्पष्टच सांगितलं...
चक्रिवादळानं लांबणीवर गेलेला पाऊस आता आणखी रखडण्याची चिन्हं असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यातच हवामानशास्त्र विभागानंही यासंदर्भातील माहिती दिल्यामुळं नागरिकांची निराशा तर झालीच, पण बळीराजाची चिंताही वाढली आहे.
हेसुद्धा वाचा : कृषीमंत्री अब्दुल सत्तार मोठ्या अडचणीत सापडणार? कारण ठरणार त्यांचा मुलगा
आयएमडीच्या माहितीनुसार येत्या आठवड्यामध्येही पावसाची अपेक्षा न बाळगलेलीच बरी. आता राज्यात थेट 23 जूननंतरच मान्सून पुन्हा नव्यानं सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे.
केरळमागोमाग मान्सून 11 जून रोजी तळकोकणाकत आला खरा पण, त्यानंतर मात्र त्याचा प्रवास फारसा समाधानकारक झाला नाही. परिणामी मान्सून पुन्हा सक्रिय होण्यास आता 23 जून उजाडण्याची वाट पाहावी लागणार आहे. आता पुढच्या मुहूर्तावरही मान्सून आला नाही, तर मात्र राज्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती आहे. राज्यात अनेक शहरात या धर्तीवर पाण्याचं नियोजनही सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.