Maharashtra Weather Updates : जानेवारी महिना उजाडला असला तरीही महाराष्ट्रातील काही निवडक जिल्हे वगळता इतर उर्वरित राज्यात अपेक्षित थंडी सुरु झालेली नाही. (Mumbai) मुंबईसुद्धा यासाठी अपवाद नाही. पहाटेच्या वेळी जाणवणारा किंचित गारठा सूर्यनारायण डोक्यावर येताच कुठच्या कुठं पळून जात आहे. ज्यामुळं दुपारपर्यंत तापमानाचा पारा चांगलाच चढता पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवस राज्यात असंच हवामान पाहायला मिळेल असं हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याच्या अनेक भागांमध्ये सध्या अरबी समुद्राच्या दक्षिणेकडे सक्रिय असणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्याचे परिणाम कमी जास्त प्रमाणात दिसून येत आहेत. ज्यामुळं तापमानातही चढ- उतार पाहायला मिळत आहेत. सध्याच्या घडीला 9 अंशांवर असणारं किमान तापमान आता 14 अंशांवर पोहोचलं आहे त्यामुळं ही तापमानवाढ आणखी किती दिवस कायम राहणार हाच प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. 


हेसुद्धा वाचा : यंदा उन्हाळ्यातही पावसाळा; हवामान विभागाचा भीतीदायक इशारा, बळीराजा आताच चिंतेत


 


सध्या पालघर, ठाण्यासह (Palghar, Thane) कोकणातील बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण असून हवेत आर्द्रतेचं प्रमाणही अधिक असल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यामुळं दुपारच्या वेळी उन्हाची दाहकता आणखी भासतेय. दरम्यान, काही दिवसांपूर्वी हवामान विभागाकडून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. आता मात्र पावसासाठी पूरक वातावरण असूनही पावसाची शक्यता मात्र धुसर झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. 


देशाच्या उत्तरेकडे थंडीचा कडाका वाढतोय 


सध्या राजस्थानातील मैदानी क्षेत्रांमध्ये थंडीचा कडाका काही अंशी कमी होत असला तरीही (Kashmir) काश्मीरच्या खोऱ्यामध्ये मात्र पारा दर दिवसागणिक खालीच जाताना दिसत आहे. काश्मीरच्या खोऱ्यावर सध्या बर्फाची चादर पाहायला मिळत आहे. तर, उत्तराखंड (Utarakhand) आणि हिमाचलचा पर्वतीय (Himachal Pradesh) भागही काहीसा असाच दिसू लागला आहे. या थंडीचा प्रभाव पंजाब, हरियाणा आणि दिल्लीपर्यंत दिसून येत आहे. 


तिथं मेघालय, नागालँडमध्येही तापमानात घट झाली असून, मधून येणाऱ्या पावसाच्या एखाद्या सरीमुळं गारवा आणखी वाढताना दिसत आहे. पुढील काही तास या भागांमध्ये अशाच पद्धतीचं हवामान कायम राहू शकतं असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. देशाच्या उत्तरेकडे सुरु असणाऱ्या या शीतलरहीचा महाराष्ट्रावर मात्र फारसा परिणाम झाला नसून अल निनोचा प्रभाव आणि समुद्रात सातत्यानं निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळं वाऱ्यांची बदलणारी दिशा हे यामागचं कारण सांगितलं जात आहे.