Weather Updates : बोचरी आणि कडाक्याची थंडी जिथं घरातून बाहेर पडणंही कठीण करत होती, तिच थंडी आता महाराष्ट्रातून काढता पाय घेण्याच्या तयारीत दिसत आहे. किंबहुना बहुतांश जिल्ह्यांमधून आता थंडीनं माघार घेतली आहे. इथं हिवाळा कमी होत असतानाच तिथं राज्यात किमान तापमानात झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. सध्याच्या घडीला राज्याचं कमाल तापमानही 36 ते 37 अंशांच्या घरात असल्यामुळं उन्हाळा आता दूर नाही हे अधिक परिणामकारकरित्या स्पष्ट होताना दिसत आहे. थोडक्यात देशभरात अतिशय झपाट्यानं हवामानात बदल अपेक्षित आहेत. 


'इथं' पावसाचा इशारा... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आणि राज्यातील हवामानाच्या सद्यस्थितीनुसार ही तापमानवाढ पुढील काही दिवस कायम राहणार असून, मराठवाडा, विदर्भावर पावसाच्या ढगांचं सावट असणार आहे. या भागांमध्ये पुढच्या 24 तासांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र आकाश निरभ्र राहून दुपारच्या वेळी उन्हाचा दाह अधिक जाणवण्याची चिन्हं आहेत. इथं मुंबई, ठाणे, पालघर भागामध्येसुद्धा आता थंडीची चिन्हं नसून, उन्हाच्या झळा अंगाची काहिली करताना दिसणार आहेत.


देशातील हवामानाच्या स्थितीनुसार सध्या विदर्भाच्या पूर्वेपासून तेलंगणा, कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळं विदर्भासह मराठवाड्यामध्ये पावसासाठी पूरक वातावरण तयार झालं आहे. अवेळी येणाऱ्या या पावसामुळं शेतपिकांवर त्याचे परिणाम आता कुठवर दिसणार याच प्रश्नानं शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकली आहे. दरम्यान, दक्षिण किनारपट्टी भागामध्ये सोसाट्याचे वारे आणि किमान स्वरुपातील पर्जन्यवृष्टीचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. 


(Jammu Kashmir, Himachal Pradesh, Uttarakhand) जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या मैदानी क्षेत्रांवरही या हवामान बदलांचा थेट परिणाम पाहायला मिळत असून, या भागांमध्येही पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. पुढच्या काही तासांसाठी हे चित्र कायम राहणार आहे. तर, पर्वतीय क्षेत्रांमध्ये मात्र किमान तापमान मोठ्या फरकानं कमी होणार असून, त्यामुळं अनेक भागांमध्ये हिमवृष्टीसुद्धा होणार आहे. 


हेसुद्धा वाचा : ...तर गाठ माझ्याशी आहे', मराठा आमदार-मंत्र्यांना मनोज जरांगे यांचा धमकीवजा इशारा


 


पुढच्या 24 तासांमध्ये अरुणाचल प्रदेशामध्ये हिमवृष्टीचा अंदाज खासगी हवामान संस्था स्कायमेटनं वर्तवला आहे. तर, आसाम, नागालँड, मेघालयमध्ये मात्र हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशाच्या उत्तर पश्चिमेला ताशी 15 ते 25 किमी वेगानं वारे वाहणार आहेत. तर, दिल्ली, हरियाणा, पंजाब प्रांतावर धुक्याची चादर कायम राहणार आहे.